मनपाद्वारे नागरिकांना रणरणत्या उन्हापासून पासून आल्हाददायक दिलासा
शहरातील १० चौकांमध्ये बसविण्याले “स्प्रिंकलर”
Date : 07 May 2026
महापौर श्रीमती निता ठाकरे, उपमहापौर श्रीमती लिला हातीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र बाल्या बोरकर आणि मनपा आयुक्त डॉ. विपिन यांच्या मार्गदर्शनाखाली उष्माघात प्रतिबंधात्मक उपाय योजना अंतर्गत सीएसआर च्या माध्यमातून नागरिकांना उष्णतेपासून दिलासा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या टेलिफोन एक्सचेंज चौक आणि छापरू नगर चौक येथे स्प्रिंकलर बसविण्यात आले आहेत. अशीच व्यवस्था शहरातील शंकर नगर चौक, संविधान चौक आणि जीपीओ चौक येथेही करण्यात येत आहे.
‘मिस्ट सिस्टम’ मुळे चौकात उभ्या असलेल्या वाहनचालकांवर हलक्या पाण्याच्या सरी पडतात, ज्यामुळे तापमानात सुमारे ५ अंशांनी घट झाल्याचा अनुभव मिळतो. या प्रणालीमध्ये ग्रीन नेटला जोडलेल्या खांबांवर जमिनीपासून सुमारे १५ फूट उंचीवर दोन्ही बाजूंना ४०-४० हाय-प्रेशर नोजल बसविण्यात आले आहेत. या नोजलना ३०० लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीशी जोडण्यात आले आहे. दिवसातून तीन वेळा टाकीत पाणी भरले जाते आणि ही प्रणाली उन्हाच्या कालावधी मध्ये कार्यरत असते. ग्रीन नेट सूर्याची तीव्रता कमी करते, तर पाण्याच्या फवारणीमुळे उकाड्यात ही थंडावा जाणवतो. नागरिकांना कडक उन्हापासून आराम मिळावा हा मनपाचा प्रयत्न आहे.