अग्निशमन केंद्राचा मार्ग मोकळा; अतिक्रमणधारकांचे अपील न्यायालयाने फेटाळले
नगरविकास आणि सार्वजनिक हितासाठी मनपाची कारवाई योग्य; जिल्हा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
Date : 11 May 2026
लकडगंज येथील 'कडबी तनास पडाव' भागातील ५८५१.५४ चौरस मीटर जागा अग्निशमन केंद्रासाठी आरक्षित आहे. या जागेवर १९७० पासून व्यवसाय करणाऱ्या एका भाडेकरूने (अपीलकर्ते ए. के. पारेख) मनपाच्या निष्कासन नोटिसीला न्यायालयात आव्हान दिले होते. अपीलकर्त्याचा दावा होता की, त्यांचे दुकान नियोजित बांधकामाच्या क्षेत्राबाहेर आहे आणि मनपाने नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे उल्लंघन करून ही कारवाई केली आहे.
जिल्हा न्यायाधीश श्री एम. एस. गणोरकर यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर स्पष्ट केले की, वाढत्या लोकसंख्येचा विचार करता सुसज्ज अग्निशमन केंद्र ही शहराची गरज आहे. केवळ मुख्य इमारतच नव्हे, तर अग्निशमन बंब (Fire Tenders) वळवण्यासाठी आणि पार्किंगसाठी संपूर्ण आरक्षित जागेची मनपाला आवश्यकता आहे. मनपाने अपीलकर्त्याला सुनावणीची योग्य संधी दिली असून, प्रशासकीय आदेशात कोणतीही बेकायदेशीरता आढळलेली नाही. वर्ष २०१४ पासून संबंधित जागेच्या लीजचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मालकीच्या जागेवर कायमस्वरूपी हक्क सांगता येणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले.
मनपाच्या वतीने ज्येष्ठ अधिवक्ता श्री. एस.के. मिश्रा आणि ॲड. ए. एम. क्वाझी यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, मंजूर विकास आराखड्यानुसार ही जागा आरक्षित असून, प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अडथळे दूर करणे आवश्यक आहे. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत ३० जानेवारी २०२६ रोजीचा मनपा उपायुक्तांचा आदेश कायम ठेवला आहे. या साठी मनपाचे विधी अधिकारी श्री सूरज पारोचे व सहायक विधी अधिकारी श्री आनंद शेंडे यांनी प्रयत्न केले.
या निकालामुळे सार्वजनिक प्रकल्पांच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमणधारकांना चपराक बसली असून, लकडगंज परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या केंद्राचे काम आता वेगाने पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.