कौटुंबिक जिवनातील समस्या सोडवून नवचैतन्य निर्माण करण्याचा मनपाचा प्रयत्न
मनपातर्फे सर्व झोनमध्ये महिला व बाल समुपदेशन केंद्रे कार्यरत
Date : 11 May 2026
महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या नेतृत्वात, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्षनेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, महिला व बालकल्याण विशेष समिती सभापती श्रीमती सारिका नांदुरकर व आयुक्त डॉ. विपीन यांच्या मार्गदर्शनात शहरातील १० झोनमध्ये समुपदेशन केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार सर्व झोनमध्ये पीडितांना मार्गदर्शन करण्यासाठी कायदेशीर तज्ज्ञ सुद्धा उपलब्ध करून दिले आहे.
या समुपदेशन केंद्रे संबंधित झोन कार्यालयामध्ये कार्यरत राहणार असून, तेथे कौटुंबिक अत्याचार व बालकांवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात पीडितांना अनुभवी समुपदेशकांकडून मार्गदर्शन व त्यांचे समुपदेशन केले जाणार आहे. यात हुंडाबळी, विधवा, घटस्फोटित स्त्रियांना मिळणारे अधिकार, स्त्री धन मिळण्याबाबत सहाय्य केले जाते. या केंद्रांमध्ये दोन समुपदेशक व एक कायदेशीर तज्ज्ञ उपलब्ध राहणार आहे. या केंद्रांमध्ये सर्वांना निःशुल्क सल्ला मिळणार आहे. या समुपदेशन केंद्रांचा नागरिकांना जास्तीतजास्त संख्येनी लाभ घ्यावा, असे आवाहन मनपाच्या समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी नागरिकांना केले आहे.
केंद्रात यावर मिळेल समुपदेशन :
1) कौटुंबिक तंटे/ संघर्ष.
2) वैवाहिक असामंजस्य.
3) हुंडा बळी / घरगुती हिंसाचार.
4) स्त्रिया व मुलां विषयी कायद्याच्या अंमलबजावणी संबंधीच्या समस्या
5) माता-पिता आणि मुले यांच्यातील असामंजस्य/ असामायोजन.
6) विधवा आणि घटस्फोटीत स्त्रियांना व त्यांच्या मुलांना मिळणारे अधिकार व वाटा याबाबत सहाय्य.
7) बालकांवर होणाऱ्या अत्याचारास प्रतिबंध.
8) स्त्रीधन मिळण्याबाबत सहाय्य.
आपल्याला किंवा आपल्या माहितीतील व्यक्तिंना वरील पैकी कुठलीही समस्या भेडसावत असल्यास समुपदेशक केंद्राशी संपर्क साधावा. या ठिकाणी विषयीची माहिती पूर्णतः गुप्त ठेवली जाणार आहे.