अतिक्रमणधारकांची गय केली जाणार नाही
'मिशन १०० डे' अंतर्गत दैनंदिन कारवाईला अधिक गती देण्याचे आयुक्तांनी दिले निर्देश
Date : 14 May 2026
बैठकीत शहरातील अवैद्य होर्डिंग सह फुटपाथ, विविध रस्त्यांवरील अतिक्रमण निर्मुलनासाठी सुरू असलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात आला. तसेच शहरातील विविध भागांमध्ये अधिकृत फेरीवाले यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी आयुक्त डॉ. विपीन यांनी अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपले अतिक्रमण काढून टाकावे, अन्यथा मनपाद्वारे होणारी कारवाई अधिक तीव्र करण्यात येईल, कुठल्याही परिस्थितीत अतिक्रमणधारकांची गय केली जाणार नसल्याचे आयुक्त डॉ. विपीन यांनी स्पष्ट केले. बैठकीत उपायुक्त सर्वश्री मिलिंद मेश्राम, मंगेश खवले, गणेश राठोड, अशोक गराटे, सहाय्यक आयुक्त सर्वश्री धनंजय जाधव, राजकुमार मेश्राम, प्रमोद वानखेडे, हरीश राऊत, विजय थूल, विकास रायबोले, संजय कांबळे, सहायक पोलीस आयुक्त(वाहतूक) श्री. महेशकुमार ठाकूर, पीएमसीचे श्री.अजिंक्य देसाई, श्री. प्रसन्ना देसाई, श्री.सिद्धार्थ गोडबोले हे आभासी पद्धतीने उपस्थित होते.
मिशन १०० डे अंतर्गत मनपा, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस विभाग, नागपूर सुधार प्रन्यास, एनएचएआय, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समन्वयने शहराला अतिक्रमण मुक्त करण्यासाठी कार्य केले जात आहे.
बैठकीत आयुक्त डॉ. विपीन यांनी एमआरटीपी कायद्यांतर्गत ज्या अवैध बांधकामांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, त्या बांधकामांवर त्वरित पाडकामाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई तीव्र करतानाच, पर्यायी जागा शोधण्याचे काम येत्या सोमवारपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले. याशिवाय मनपाच्या पार्किंगच्या जागांचा वापर नेमका कशासाठी होतोय, याचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. बैठकीत उपायुक्त श्री. मंगेश खवले यांनी सर्वप्रथम आजतागायत करण्यात आलेल्या कारवाईची माहिती सादर केली.