प्रदूषणाच्या विळख्यातून नाईक तलावाची मुक्तता
महापौरांनी घेतला विकासकामांचा आढावा
Date : 14 May 2026
गुरुवारी(ता.१४) सकाळी महापौरांनी नाईक तलाव आणि लेंडी तलाव परिसराचा दौरा करून सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली.
काही महिन्यांपूर्वीपर्यंत नाईक तलाव जलपर्णी, दुर्गंधी आणि अस्वच्छतेच्या विळख्यात होता. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. मात्र, मनपाच्या विशेष स्वच्छता अभियानामुळे तलावाला नवजीवन प्राप्त झाले आहे. पाहणीदरम्यान महापौर निता ठाकरे यांनी नागरिकांच्या सुविधेसाठी तलाव परिसरात तातडीने 'वॉकिंग ट्रॅक' सुरू करण्याचे तसेच परिसराच्या सुरक्षिततेसाठी तलावाच्या संरक्षक भिंतीवर त्वरित 'ग्रील्स' लावण्याचे आदेश दिले.
लेंडी तलावाच्या पाहणी दरम्यान महापौरांनी तेथील अतिक्रमणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तलावाच्या पात्रात आणि परिसरात असलेले अतिक्रमण लवकरात लवकर काढण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे यांनी संबंधित नागरिकांना नोटिसा बजावून कायदेशीर कारवाई करण्याची सूचना प्रशासनाला दिली. तसेच पावसाळ्यात तलाव ओव्हरफ्लो होऊन वस्तीत पाणी शिरू नये, यासाठी पाण्याचा प्रवाह सुरक्षित ठिकाणी वळवण्याचे आदेशही देण्यात आले.
शहीद बाबुलाल बैरागी उद्यानापासून सुरू झालेल्या या पाहणी दौऱ्यात उपमहापौर श्रीमती लिला हातीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, नगरसेवक श्री. रामभाऊ आंबुलकर, श्रीमती रेखा निमजे, श्री. हेमंत बरडे, श्री. तुषार लारोकर आणि माजी उपमहापौर श्री. दीपराज पार्डीकर यांच्यासह अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, सहायक आयुक्त श्री. हरीश राऊत कार्यकारी अभियंता श्री.मंगेश गेडाम, कार्यकारी अभियंता श्री. उज्वल धनविजय कार्यकारी अभियंता श्री. राजेश दुफारे, श्री.प्रशांत वाघमारे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी स्थानिक नागरिकांनी महापौर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी महापौरांनी नागरिकांशी चर्चा केली व त्यांचे प्रश्न जाणून घेतले.
पदाधिकाऱ्यांनी केले कारपुलिंग
मा. पंतप्रधान श्री. नरेन्द्र मोदी यांच्या कारपुलिंगच्या आवाहनाला प्रतिसाद देत महापौर श्रीमती निता ठाकरे, उपमहापौर श्रीमती लिला हातीबेड आणि स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे यांनी अंबाझरी व नाईक तलावाच्या पाहणी दरम्यान कारपुलिंग करीत एकाच वाहनाचा वापर केला. त्यांच्या या कार्याचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.