महानगरपालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी अपघात विमाची सुविधा
वेतन खातेदारांना ४० लक्ष ते १.२५ कोटींपर्यंत अपघात विमा
Date : 19 May 2026
यासंदर्भात मनपा आयुक्त डॉ. विपीन यांच्या मार्गदर्शनात नागपूर महानगरपालिका आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यामध्ये सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. यानुसार महानगरपालिकेतील ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन खाते बँक ऑफ महाराष्ट्र येथे आहे, त्यांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. तसेच अपघात विम्यासोबतच इतरही विविध बँकिंग सुविधा आणि आर्थिक लाभ या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहेत.
महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अद्याप या योजनेचा लाभ घेतलेला नाही, त्यांनी तातडीने बँक ऑफ महाराष्ट्र येथे आपले वेतन खाते सुरू करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. सदाशिव शेळके यांनी केले आहे.
याशिवाय नागपूर महानगरपालिका कर्मचारी सहकारी बँक लिमिटेड, नागपूर येथे वेतन खाते असलेल्या कर्मचाऱ्यांनाही सध्या २५ लाख रुपयांपर्यंत अपघात विमा सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. मात्र, महानगरपालिकेतर्फे या सहकारी बँकेलाही बँक ऑफ महाराष्ट्रच्या धर्तीवर किमान ४० लाख रुपयांपर्यंत अपघात विमा संरक्षण उपलब्ध करून देण्याबाबत सूचना करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने ही योजना अत्यंत उपयुक्त ठरणार असून अनपेक्षित अपघाताच्या परिस्थितीत आर्थिक संरक्षण मिळण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संबंधित बँकेशी संपर्क साधून आपल्या वेतन खात्यावर या विमा सुरक्षा योजनेचा लाभ लागू करून घ्यावा, असे आवाहन मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. सदाशिव शेळके यांनी केले आहे.