अत्याधुनिक यंत्राच्या सहाय्याने काढल्याजाताय अंबाझरीतील ‘जलपर्णी’
जलपर्णी काढण्याच्या कार्याची महापौर, स्थायी समिती सभापती व आयुक्तांकडून संयुक्त पाहणी
Date : 21 May 2026
तलावातील जलपर्णी वेगाने काढण्यासाठी या दोन्ही अत्याधुनिक मशिन्ससोबतच ५ पोकलँड, २ जेसीबी आणि काही टिप्परचीही मदत घेतली जात आहे. या नव्या यंत्रसामग्रीमुळे अंबाझरी तलाव जलपर्णीमुक्त करण्याच्या कामाला मोठी गती मिळणार आहे. 'हार्वेस्टर' यंत्र ही मोठ्या तलावांमधील जलपर्णी, अतिरिक्त जलवनस्पती आणि उपद्रवी वनस्पतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत पर्यावरणपूरक पद्धतीने काम करते. ही अत्याधुनिक यंत्रे पाण्याखालील, आणि पाण्यावर तरंगणाऱ्या वनस्पतींच्या व्यवस्थापनात अतिशय कार्यक्षम आहेत.
'प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना' आणि 'जिल्हा खनिज प्रतिष्ठान, नागपूर' अंतर्गत पर्यावरण संरक्षण व प्रदूषण नियंत्रण उपाययोजना निधीतून या मशीनची खरेदी करण्यात आली आहे. हे यंत्र एकाच वेळी साडेचार ते पाच टन जलपर्णी काढू शकते. दिवसाकाठी किमान एक ते दोन एकर परिसरातील जलपर्णी साफ करण्याची या यंत्राची क्षमता आहे. या अत्याधुनिक यंत्रामुळे अंबाझरी तलावाचे नैसर्गिक सौंदर्य परत मिळण्यास आणि तलावाला जलपर्णीच्या विळख्यातून दूर करण्यासाठी मोठी मदत होणार आहे.