रणरणत्या उन्हापासून बचावासाठी बेघरांना मनपाचा आधार
466 बेघरांना मिळाला सुरक्षित निवारा, 159 जणांचे यशस्वी पुनर्वसन मे महिन्यात 76 बेघरांना रस्त्यावरून निवारा केंद्रात केले सुरक्षित दाखल
Date : 22 May 2026
महापौर श्रीमती निता ठाकरे आणि नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली, मनपा आयुक्त डॉ. विपीन यांच्या निर्देशानुसार, समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांच्या सहकार्याने ‘भिक्षेकरीमुक्त नागपूर उष्माघात प्रतिबंध मोहीम - मिशन मुक्ती फेज 3’ सुरू आहे. मनपाच्या संयुक्त पथकाने एप्रिल महिन्यात 120 तर मे महिन्यात 76 बेघर असे एकून 196 नागरिकांना रस्त्यावरुन निवारा केंद्रात सुरक्षितरित्या दाखल केले आहे. यापैकी 159 नागरिकांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. काहींना त्यांच्या कुटुंबासोबत पुन्हा जोडण्यात आले, काहींना रोजगार मिळवून देण्यात आला, तर काहींना त्यांच्या गावी पाठवण्यात आले. कॉटन मार्केट, मोमीनपुरा, शनी मंदिर, सीताबर्डी आणि वर्धा रोड परिसरात नुकतीच विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत २० पुरुष, १९ महिला आणि १३ बालकांसह एकूण ५२ नागरिकांना निवारा, आरोग्य सेवा आणि पुनर्वसनाची मदत देण्यात आली. उघड्यावर झोपणाऱ्या बेघर/भिक्षेकरी व निराधारांना बेघर निवारा केंद्राचा मोठा आधार मिळाला आहे.
सध्या मनपाच्या सात निवारा केंद्राची क्षमता 450 असली तरी प्रत्यक्षात 466 नागरिक तेथे राहत आहेत. आनंदी जीवन जगण्याचा अधिकार त्यांनाही आहे, म्हणून त्यांचे जीवन सुसह्य करण्याच्या दृष्टीने दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत चालणाऱ्या या केंद्रांमध्ये लाभार्थींना अन्न, कपडे, निवारा, सुरक्षा, आरोग्य सेवा, समुपदेशन, व्यसनमुक्ती उपचार आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आवश्यक मदत मोफत दिली जाते. आतापर्यंत ७९ लाभार्थ्यांना त्यांच्या कुटुंबाशी पुन्हा जोडण्यात आले आहे. तसेच १५ जणांना रोजगार मिळवून देण्यात आला असून, १० वृद्धांना सन्मानाने वृद्धाश्रमात दाखल करण्यात आले आहे.
शहरात उष्माघातामुळे जीवितहानी होऊ नये यासाठी शहरतील रस्ते, बाजार, बसस्थानक, तसेच शहरातील प्रमुख ठिकाणी तीव्र उन्हाळ्यात एखादी बेघर व्यक्ती रस्त्यावर दिसल्यास नागरिकांनी दुर्लक्ष न करता जवळच्या निवाराकेंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन मनपाने केले आहे.
नागपूर शहरामध्ये खालीलप्रमाणे शहरी बेघर निवारा व भिक्षेकरी निवारागृह कार्यरत आहे.