पावसाळापूर्वीची कामे युद्धपातळीवर पूर्ण करा: आयुक्त डॉ विपीन
आयुक्तांनी घेतला पावसाळ्यापूर्वी नियोजनाचा आढावा
Date : 25 May 2026
मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी सोमवारी(ता.२५) पावसाळ्यापूर्वी सर्व विभागांनी केलेल्या तयारीचा तसेच आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतला. आयुक्त सभाकक्षात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत अतिरिक्त आयुक्त श्री.अंकित, अतिरिक्त आयुक्त श्री. मुरुगानंथम एम., प्र. अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम, मुख्य अभियंता श्री. मनोज तालेवार,उपायुक्त श्री. राजेश भगत, श्री. गणेश राठोड, श्री. अशोक गराटे, अधीक्षक अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. तुषार बाराहाते यांच्यासह सर्व झोनचे सहायक आयुक्त, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, उद्यान संवर्धक श्री. अमोल चौरपगार यांच्यासह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, सर्व झोनचे कार्यकारी अभियंता, एनडीआरएफ, एसडीआरएफ यांचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.
आयुक्त डॉ विपीन यांनी मनपाद्वारा पावसाळ्यापूर्व केलेल्या जाणाऱ्या तयारीचा आढावा घेत शहरातील रस्ते, पूल, सखल भाग, सर्व नदी नाले सफाई, तलाव सफाई, धोकादायक झाडांच्या फांद्या कापणे तसेच धोकादायक इमारतींची माहिती गोळा करून आवश्यकतेनुसार कारवाई करण्याचे सूचित केले. आवश्यकतेनुसार लागणाऱ्या यंत्र सामग्रीची यादी करून घ्यावी, नागरिकांच्या सोयीसाठी लवकरच झोननिहाय नियंत्रण कक्ष सुरू करण्याच्याही सूचना आयुक्त डॉ. विपीन यांनी दिले. शहरातील सखल भागातील पाण्याचा निचरा त्वरित करता यावा याकरिता आवश्यक उपाययोजना राबविण्यात याव्यात. सर्व सहायक आयुक्त यांनी आपल्या स्तरावर झोन सभापतींसोबत बैठक घेऊन योग्य नियोजन करावे, तसेच झोन क्षेत्रातील प्रभागामध्ये पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेली नाले सफाई, ड्रेन सफाई व ड्रेनच्या चेंबरची सफाई संबधित प्रभागातील नगरसेवकांच्या सुद्धा लक्षात आणून द्यावे, झाडांच्या फांद्या कापतानाचे जीआयएस फोटो घ्यावे, याशिवाय आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत पोहोचविण्यासाठी झोन स्तरावर २४ तास यंत्रणा सज्ज ठेवावी, असेही निर्देश आयुक्त डॉ. विपीन यांनी दिले. बैठकीत सर्वप्रथम विभाग प्रमुखांनी संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून विभागाची माहिती सादर केली.
अंबाझरीतील जलपर्णी काढण्यासाठी सीएसआर द्वारा घ्या अतिरिक्त मशिनरी
अंबाझरी तलावात पडलेल्या जलपर्णीचा विळखा कमी करण्याचे कार्य केले जात असून, नवीन मशीनच्या मदतीने तलावातून जलपर्णी काढण्यात येत आहे. या कामासाठी आवश्यकतेनुसार लागणारी अतिरिक्त मशिनरीचा म्हणजे, जेसीबी टिप्पर सारख्या मशीन या कंपनी सामाजिक जबाबदारी(सीएसआर) च्या मध्यातून घ्याव्यात. अशी सूचना मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी केली.
मॉकड्रील करून घ्या तयारीचा आढावा
अग्निशमन विभागाने पावसाळा सुरू होण्यापूर्वी एसडीआरएफ आणि एनडीआरएफ यांच्याशी समन्वय साधून अंबाझरी तलावात मॉकड्रील घेऊन आपल्या तयारीचा आढावा घ्यावा, जेणेकरून संपूर्ण यंत्रणा कितपत सज्ज आहे याची माहिती होईल. अशी सूचना देखील आयुक्त डॉ. विपीन यांनी केली.
..