मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
Date : 27 May 2026
यावेळी लकडगंज झोन येथे आयोजित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणी शिबीर कार्यक्रमात येथे आमदार श्री. कृष्णा खोपडे, माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी,वैद्यकीय आरोग्य सभापती श्रीमती मनिषा अतकरे, जलप्रदाय समितीच्या सभापती श्रीमती दिव्या धुरडे,यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
मा. महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या संकल्पनेतून सफाई कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेला, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्ता पक्ष नेते श्री नरेंद्र (बाल्या) बोरकर, वैद्यकीय आरोग्य सभापती श्रीमती मनिषा अतकरे, आयुक्त डॉ. विपीन, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी शिबीर उपक्रम सुरू आहे. तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख उपायुक्त श्री राजेश भगत, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार आणि मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्या देखरेखीखाली शिबिराचे नियोजन करण्यात येत आहे.
मनपाच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील सर्व झोनअंतर्गत कार्यरत सर्व सफाई कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांच्या प्राथमिक आरोग्य चाचण्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये HLL मार्फत करण्यात येत असून, त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर तसेच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे पुढील तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे.
प्रत्येक दिवशी किमान १०० सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्याचा उद्देश असून, त्याअंतर्गत रक्त तपासणी, रेडिओलॉजी तसेच इतर आवश्यक वैद्यकीय चाचण्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMC), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (IGGMC) येथे करण्यात येत आहेत. प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय फाईल तयार करण्यात येत असून, तपासणीदरम्यान निवासी विशेष तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार संबंधित कर्मचाऱ्यांना पुढील उपचार व मार्गदर्शनही करण्यात येत आहे. तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या ने-आण व्यवस्थेची जबाबदारी महानगरपालिकेमार्फत पार पाडण्यात येत आहे.