भांडेवाडीतील सीबीजी प्रकल्पाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पाहणी
पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महापौर श्रीमती निता ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती
Date : 30 May 2026
पाहणी दरम्यान आमदार श्री. कृष्णा खोपडे, आमदार श्री. प्रवीण दटके, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे, मनपा आयुक्त डॉ. विपीन, राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष श्री. प्यारे खान, आरोग्य विशेष समिती सभापती श्रीमती मनीषा अतकरे, मनपाच्या अधीक्षक अभियंता श्री.श्वेता बॅनर्जी, सहायक आयुक्त श्री विकास रायबोल, कार्यकारी अभियंता श्री राजेश दुफारे, झोन सभापती श्रीमती उमा देशमुख यांच्यासह इतर सभापती नगरसेवक यांच्यासह केवा सुसबिडीचे श्री.वीरेंद्र ठाकूर, श्री. विनोद टंडन, श्री. विजय चिपळूणकर उपस्थित होते.
नागपूर महानगरपालिका आणि नेदरलॅडच्या सुसबिडी यांच्याद्वारे भांडेवाडीतील ३० एकर जागेवर उभारण्यात आलेल्या प्रकल्पाची पाहणी करीत मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, हा प्रकल्प तीन टप्प्यांत कार्यान्वित केला जाणार आहे. यात पहिल्या टप्प्यात ४०० टन, त्यानंतर दुसऱ्या ४०० टनाच्या टप्प्यात आणि ऑगस्ट २०२६ पर्यंत १२०० टन कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्याची क्षमता हा प्रकल्प गाठणार आहे. ऑगस्ट महिन्यात हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार असल्याचे ही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून मौल्यवान उपपदार्थ मिळवणे, हे या प्रकल्पाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. या प्रकल्पातून दररोज सुमारे २८ टीपीडी गॅसची निर्मिती होणार आहे. तसेच सुमारे १२० टीपीडी दर्जेदार सेंद्रिय खताची निर्मिती केली जाईल व दररोज सुमारे ४०० टीपीडी आरडीएफ तयार होईल, ज्याचा वापर सिमेंट कारखाने व इतर उद्योगांमध्ये इंधन म्हणून केला जाणार आहे. या प्रकल्पाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे, हा प्रकल्प पूर्णपणे खाजगी गुंतवणुकीतून उभारण्यात आला आहे. यासाठी महानगरपालिकेला कोणतीही 'टिपिंग फी' द्यावी लागणार नाही, ही महानगरपालिकेसाठी मोठी आर्थिक दिलासा देणारी बाब आहे. या प्रकल्पावर तब्बल ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून, हे मॉडेल संपूर्ण देशासाठी एक आदर्श ठरणार आहे.
भांडेवाडीच्या दुर्गंधीपासून नागरिकांची सुटका
वर्षानुवर्षे पूर्व नागपूरच्या नागरिकांसाठी त्रासदायक ठरलेला भांडेवाडी येथील कचऱ्याचे ढिगारे आणि त्यातून येणारी दुर्गंधी या प्रकल्पाच्या माध्यमातून आता इतिहासजमा होणार आहे. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले की, पुढील तीन ते चार महिन्यांत या परिसरातील दुर्गंधीचा प्रश्न पूर्णपणे संपुष्टात येईल. तसेच, वर्षभरात कचऱ्याचे सर्व ढिगारे नष्ट होऊन ती जमीन पूर्णपणे मोकळी होईल आणि पर्यावरणाची हानी टळणार आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वामुळे नागपूर शहर भविष्यात अधिक स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त होण्याच्या दिशेने एक निर्णायक पाऊल उचलण्यात येत आहे. प्रकल्पाविषयी माहिती देताना आयुक्त डॉ. विपीन यांनी पुढील दोन वर्षात डम्पिंग मुक्त शहर करण्याचा मानस असल्याचे सांगितले. तर महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी मुख्यमंत्र्याशी प्रकल्पाविषयी सविस्तर चर्चा केली.
पाहणीदरम्यान सर्वप्रथम मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर सर्व मान्यवरांनी प्रकल्पाच्या प्रतिकृतीद्वारे माहिती जाणून घेतली. नंतर टनेल, कंट्रोल रूमची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.