लोकसहभागातून 5 लाख वृक्षारोपणाची मोहीम राबविणार महापौर श्रीमती निता ठाकरे यांची माहिती
व्यापक मोहिमेचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 5 जूनला शुभारंभ
Date : 03 Jun 2026
पर्यावरण संवर्धन पंधरवड्यानिमित्त शहरातील नदी, नाले, तलावांसह विविध सार्वजनिक स्थळांची स्वच्छता करण्याची मोहिम जागतिक पर्यावरण दिनापासून (5 जून) राबविण्यात येणार आहे. या संदर्भात पत्रकारांना माहिती देताना महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी या पंधरवड्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली. यावेळी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे व सत्ता पक्षनेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर उपस्थित होते. स्वच्छतेची ही व्यापक मोहिम जागतिक योग दिनापर्यंत (21 जून) राबविण्यात येणार आहे.
माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार पर्यावरण संवर्धनासाठी विविध पावले उचलण्याची आवश्यकता आहे. एक पेड मां के नाम या उपक्रमाच्या धर्तीवर शहरात ही व्यापक प्रमाणावर मोहिम राबविली जाणार आहे. येत्या 5 जूनला जागतिक पर्यावरण दिनानिमित्त या मोहिमेची सुरूवात होणार असली तरी वर्षभरात शहरात ही 5 लाख झाडे लावण्यात येणार आहे. यासाठी शहरातील उद्याने, नदी व तलावांचे काठ, शहराचा आऊटर भाग तसेच प्रत्येक प्रभागामध्ये नगरसेवकांच्या सल्ल्याने शहरातील प्रत्येक भागात वृक्षारोपण केले जाणार आहे. या मोहिमेसाठी आतापासून सुरूवात केली जाणार आहे. यासाठी खड्डे खोदणे, त्याच माती व खते टाकून ठेवली जाणार आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर मनपाचा उद्यान विभाग तसेच सामाजिक वनीकरण विभागाच्या मदतीने 5 लाख रोपटे लावण्यात येणार आहे. शहराचे वाढते तापमान लक्षात घेता ही काळाची गरज आहे. यासाठी ही रोपटे जिवंत राहील , याची काळजी घेण्यासाठी संबंधित झोनमधील अधिकारी, कर्मचारी तसेच नगरसेवक, ज्येष्ठ नागरिक, पोलीस मित्र, मोहल्ला समिती, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधींचे सहकार्य घेतले जाईल, असेही महापौरांनी सांगितले.
स्वच्छतेवर भर देताना शहरातील तलाव, उद्यान, धार्मिक स्थळ, बाजारपेठ, दहन घाट, सार्वजनिक परिवहन तळ, पर्यटन व वारसा स्थळांची स्वच्छता केली जाणार आहे. यासोबतच शहरात जमा होणार ईलेक्ट्रॉनिक कचरा सुद्धा जमा केला जाणार आहे. यासाठी व्यापक कार्यक्रम ठरविण्यात आला आहे. शहराच्या स्वच्छतेसाठी ही मोहिम असल्याने शहरातील प्रत्येक नागरिकाने यात सहभाग नोंदविणे अपेक्षित आहे. यासाठी नागरिकांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे यासाठी, नागरिकांना प्रोत्साहनपर काही वस्तू देण्याचा मानस महापौरांना यावेळी व्यक्त केला.
प्रत्येक दिवसासाठी वि्शेष मोहिम निश्चित केली आहे. यात 5 जूनला वृक्षारोपण केले जाणार आहे. त्यानंतर प्रत्येक दिवशी संबंधित स्थळांची स्वच्छता केली जाणार आहे. या दिवशी या स्थळाची प्रासंगिक म्हणून स्वच्छता केली जाणार असली तरी ही स्वच्छता कायमस्वरुपात राहावी, यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. केवळ एक दिवसाचा हा उपक्रम न राहता शहर कायम स्वच्छ कसे राहील यावर भर दिला जाणार आहे. यासाठी नागरिक, सेवानिवृत्त कर्मचारी, पोलीस मित्र, एनजीओचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांना आवाहन करण्यात येत आहे. शहराची स्वच्छता ही केवळ मनपाची नव्हे तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, या भूमिकेतून ही मोहिम राबविली जाणार असल्याचे महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी सांगितले.
अभियानादरम्यान 5 जून रोजी वृक्षारोपण, 6 जून रोजी तलावाची सफाई, 7 जून रोजी सायकल रॅली, 8 जून रोजी उद्यानाची स्वच्छता, 9 जून रोजी मैदानाची स्वच्छता, 10 जून रोजी धार्मिक स्थळाची स्वच्छता, 11 जून रोजी बाजार, वाणिज्य , मॉल, मंडी यांची स्वच्छता, 12 जून रोजी घाटांची स्वच्छता, 13 जून रोजी वाहनतळाची स्वच्छता, 14 जून रोजी ई-वेस्ट गोळा करण्याची विशेष मोहिम, 15 जून रोजी रुग्णालयाची स्वच्छता, 16 जून रोजी सोसायटी, मोहल्ला, रहिवासी क्षेत्राची स्वच्छता, 17 जून रोजी हेरिटेज प्लेस, टूरिस्ट प्लेस स्वच्छता, 18 जून रोजी वस्त्यांची स्वच्छता, 19 जून रोजी बीडब्ल्यूजी वर्कशॉप, चित्रकला स्पर्धा, सौंदर्यीकरण कामे, 20 जून रोजी योगा केंद्राची स्वच्छता, चित्रकला स्पर्धा, सौंदर्यीकरण कामे, 21 जून रोजी आंतराष्ट्रीय योग दिन साजरा करून या विशेष स्वच्छता मोहिमेत भाग घेतलेल्या नागरिकांचा सत्कार करण्यात येणार आहे.
जलपर्णीचे निर्मूलन होणार
शहरातील तलावांमध्ये वाढणाऱ्या घातक जलपर्णीच्या निर्मूलनासाठी मनपाने विशेष मोहिम राबविली जात असून, दररोज दीडशे ते दोनशे टन जलपर्णी काढून टाकण्यासाठी नवीन यंत्रणांचा वापर सुरू आहे. येत्या काही दिवसात जलपर्णीचे पूर्ण उच्चाटन करण्याचे प्रयत्न केल्या जात आहे., असेही महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी सांगितले.
अतिक्रमण हटाव मोहिम थांबणार नाही
शहरात सुरू असलेली मिशन 100 डेज ही अतिक्रमण हटाव मोहिम थांबणार नसून पुन्हा अतिक्रमण होणार नाही. यासाठी कठोर उपाययोजना सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. फूटपाथ लोकांना चालण्यासाठी मोकळा राहावा, हा या मोहिमेमागे उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सायकल मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घ्यावा
पर्यावरण संवर्धनासाठी मनपातर्फे येत्या 7 जूनला सकाळी ६.३० वाजता सायकल मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महापौरांनी केले. पर्यावरण व स्वच्छेतेचा संदेश देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.
पर्यावरण संवर्धन पंधरवड्यानिमित्त शहरात स्वच्छता अभियान राबविण्यासाठी समाजातील विविध घटकांशी तसेच शासकीय कार्यालये व संस्थांच्या प्रतिनिधींच्या बैठका घेऊन हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी केले. यावेळी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्षनेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, विरोधी पक्ष नेते श्री. संजय महाकाळकर यांच्यासह इतर गटनेते, आरोग्य सभापती श्रीमती मनीषा अतकरे, क्रीडा सभापती श्री. दर्शनी धवड, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, मनपाच्या सर्व झोनचे अधिकारी उपस्थित होते.
यात क्रेडाई, शहरातील धार्मिक स्थळांचे संचालक, परिवहन विभागाशी संबंधित संस्था, बाजारपेठांशी संबंधित संस्था, सोशल मीडिया इन्फ़ुएनसर यांच्यासह इतर प्रतिनिधींच्या बैठका घेऊन शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. धार्मिक स्थळांच्या संचालकांच्या बैठकीत सर्वश्री अशोक गायकवाड, श्री. राजीव कोलते, श्री. यशवंत जानवे, श्री. नेल्सन फ्रांसीस, श्री. मधु मेश्राम, श्री. रत्नेश्वर मिश्रा उपस्थित होते. त्याचप्रमाणे परिवहन विभागाच्या संबंधित बैठकीला उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, महामेट्रोचे श्री. महेश मोरोणे, विमानतळ प्राधिकरणाच्या श्रीमती प्रियंका पडोळे, परिवहन व्यवस्थापक श्री. योगेश लुंगे, श्री. राजीव घाटोळे, अमर डबरासे, श्री. अमोल ठाकरे, श्री. अभिजीत देवतळे उपस्थित होते.