मनपाच्या वृक्षारोपण महामोहिमेचाउद्या (ता. 5) केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते शुभारंभ
पर्यावरण संवर्धन पंधरवड्याला सुरूवात
Date : 04 Jun 2026
सुयोगनगरमध्ये होणार्या वृक्षारोपणाच्या या कार्यक्रमाला महापौर श्रीमती निता ठाकरे, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्षनेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, विरोधी पक्षनेते श्री. संजय महाकाळकर व आयुक्त डॉ. विपीन उपस्थित राहणार आहेत.
शहराची स्वच्छता राखण्यासाठी तसेच शहराचे हिरवे आच्छादन वाढविण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनापासून (ता. 5 जून) ते जागतिक योग दिन (ता. 21 जून) पर्यंत मनपातर्फे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. मनपाचा वृक्षारोपण महामोहिमेचा उपक्रम या साखळीतील एक भाग आहे. शहराचे हिरवे आच्छादन वाढविण्यासाठी झाडांची संख्या वाढविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. वाढते तापमान व पर्यावरणात होणार्या बदलांचा सामना करण्यासाठी झाडांची संख्या वाढविण्यासाठी महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम हाती घेतला आहे.
सर्व विधानसभा क्षेत्रात वृक्षारोपण
वृक्षारोपणाच्या या महामोहिमेच्या पहिल्या दिवशी 5 जून रोजी सकाळी 8 ते 10 वाजे दरम्यान शहरातील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये या मोहिमेची सुरूवात होणार आहे. दक्षिण नागपूरमध्ये चिटणवीस उद्यानात महापौर श्रीमती निता ठाकरे व आमदार श्री. मोहन मते यांच्या हस्ते वृक्षारोपण होणार आहे. पूर्व नागपूरमध्ये आमदार श्री. कृष्णा खोपडे यांच्या हस्ते मिनीमाता नगर मैदानात वृक्षारोपण होईल. उत्तर नागपूरमध्ये आमदार डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते वैशालीनगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात वृक्षारोपणाचा कार्यक्रम होईल. मध्य नागपूरमध्ये आमदार श्री. प्रवीण दटके यांच्या हस्ते गांधीबाग उद्यान, बालभवन, व विणकर कॉलनी मैदानात वृक्षारोपण होणार आहे तर पश्चिम नागपूरमध्ये आमदार श्री. विकास ठाकरे यांच्या हस्ते शिवाजीनगर उद्यानात वृक्षारोपण केले जाणार आहे. यावेळी संबंधित प्रभागातील नगरसेवक व नगरसेविका उपस्थित राहणार आहेत.
पर्यावरण संवर्धन पंधरवड्यात राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांमध्ये वृक्षारोपणासोबतच तलावांची साफसफाई, उद्यानाची साफसफाई, धार्मिक स्थळे व शहरातील सर्व दहन घाट परिसराची स्वच्छता, सार्वजनिक परिवहन डेपो, वारसा स्थळांची साफसफाई प्रामुख्याने या मोहिमेअंतर्गत केली जाणार आहे. महापौर श्रीमती निता ठाकरे उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्षनेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, विरोधी पक्षनेते श्री. संजय महाकाळकर व आयुक्त डॉ. विपीन यांच्या नेतृत्वात विविध उपक्रम शहरातील विविध भागात राबविले जाणार आहेत.
तलावांची साफसफाई 6 जूनला
शहरातील प्रमुख तलावांची साफसफाई करण्याची मोहीम येत्या 6 जूनला राबविण्यात येणार आहे. दक्षिण नागपूरमधील सोनेगाव तलाव, दक्षिण-पश्चिम नागपुरातील पांढराबोडी तलाव, पश्चिम नागपुरातील पोलीस लाईन टाकळी तलाव, दक्षिण नागपुरातील सक्करदरा तलाव, मध्य नागपुरातील नाईक तलाव, मध्य नागपुरातील गांधीसागर तलाव व उत्तर नागपुरातील बिनाकी मंगळवारी तलावाची साफसफाई केली जाणार आहे. यावेळी नागरिकांनी स्वयंस्फूर्ती येऊन परिसरातील तलावांची साफसफाई करण्यासाठी सहकार्य करावे, असे् आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.
सर्व विभागांना निर्देश – आयुक्त डॉ. विपीन
ही मोहिम लोकसहभागातून राबविण्यावर भर राहणार असून मनपाच्या विविध विभागासह राज्य व केंद्र सरकारच्या संबंधित विभागांचे सहकार्य सुद्धा घेतले जाणार आहे. मनपाच्या सर्व विभागाने व सर्व झोनमधील कर्मचार्यांनी ही मोहिम यशस्वी करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. विपीन यांनी सर्व विभाग प्रमुखांच्या बैठकीत दिले. तसेच साफसफाई करण्यासाठी आवश्यक सामुग्रीची उपलब्धता प्रशासनाने करून द्यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
नागपूर शहराला स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी मनपासोबत या शहरातील नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. या सर्व उपक्रमांमध्ये नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी केले आहे.
स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य -
यासोबत शहराती स्वयंसेवी संस्था, सेवानिवृत्त कर्मचारी, पोलीस मित्र, विविध संस्थांचे प्रतिनिधींनी सुद्धा ही मोहिम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याची हमी दिली आहे. या संदर्भात महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी शहरातील या विविध संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला व सहकार्याचे आवाहन केले.