शहरात अत्याधुनिक स्मार्ट वृक्ष मूल्यांकन उपक्रमाला सुरूवात 'एआय आणि LiDAR आधारित स्मार्ट वृक्ष मूल्यांकन पायलट प्रकल्प'
5 हजार वृक्षांची तपासणी करण्याच्या मोहिमेचे महापौर निता ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण
Date : 10 Jun 2026
यावेळी आमदार श्री. संजय भेंडे, आमदार श्री. प्रवीण दटके, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्ष नेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, आयुक्त डॉ. विपीन, अतिरिक्त आयुक्त श्री. मुरुगानंथम एम., एमआयएमचे गटनेते श्री. शकील पटेल, माजी आमदार श्री. अनिल सोले, लक्ष्मीनगर झोनच्या सभापती श्रीमती लक्ष्मी यादव, स्थापत्य व विशेष प्रकल्प विशेष समितीच्या सभापती श्रीमती अश्विनी जिचकार, जलप्रदाय विशेष समितीचे उपसभापती विजय झलके, नगरसेवक लखन येरावार, नगरसेवक श्री. विजय होले, नगरसेवक श्री. अमोल शामकुळे, नगरसेवक श्री. विनय दाणी, नगरसेविका श्रीमती माया हाडे, नगरसेवक श्री. मनोज साबळे, नगरसेवक सुनील दांडेकर, नगरसेविका श्रीमती वर्षा चौधरी यांच्यासह या उपक्रमाचे संयोजक श्री. वैभव राजे, नानाजी देशमुख प्रतिष्ठानचे श्री. संजय पांडे, ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे श्री. कौस्तव चॅटर्जी, उपायुक्त श्री. गणेश राठोड, वृक्ष संवर्धक श्री. अमोल चौरपगार, सहाय्यक आयुक्त श्री. धनंजय जाधव, झोन स्वच्छता अधिकारी श्री. ऋषीकेश इंगळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नातून विशेष उपक्रम
गेल्या मार्च महिन्यात दुसऱ्या आंतरराष्ट्रीय आर्बोरीकल्चर संमेलनात मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना ही माहिती देण्यात आली होती.नंतर श्री. फडणवीस यांच्या विशेष प्रयत्नातून प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानातून वृक्षांच्या संवर्धनासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची शक्यता तपासण्यासाठी प्रायोगिक तत्वावर या तंत्रज्ञानाचा वापर यापूर्वी मुंबईत करण्यात आला आहे. यातून वृक्षांच्या दीर्घकालिन संवर्धनास मदत होणार आहे. या उपक्रमाच्या कार्यान्वयाची जबाबदारी ट्रीकोटेक एलएलपीकडे सोपविण्यात आली असून या तंत्रज्ञानाला ग्री हिल पीटीईच्या माध्यमातून लागू केले आहे. या माहितीचे विशेषण करून त्याचा अहवाल मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना सादर केले जाणार आहे. या संदर्भातील माहिती ट्रीकोटेकचे प्रमुख श्री. वैभव राजे यांनी उपस्थितांना दिली.
चालत्या गाडीतून स्कॅनिंग होणार
युरोपातून प्रायोगिक तत्वावर आणण्यात आलेली ही मशीन एआय व लायडर प्रणालीच्या आधारावर माहिती संकलित करते. चारचाकी गाडीवर लावण्यात आलेल्या सेंसरच्या मदतीने झाडांचा सर्व माहिती संकलित करते. एका चारचाकी गाडीवर सेंसर लावलेले असतात. ही गाडी 30 ते 40 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने शहरात फिरणार आहे. यातून झाडांची थ्री डी इमेज प्राप्त होणार आहे. हे सेंसर तात्काळ वृक्षांचे स्कॅन करून माहितीचा कच्चा डाटा संकलित करीत जातो. ही माहिती गाडीतील स्क्रिनवर सुद्धा उपलब्ध राहणार आहे. यातून झाडांचे आयुष्य किती आहे, वृक्षांची उंची किती आहे, वृक्ष कोणत्या प्रजातीचे आहे, झाडाचा बुंधा किती सक्षम आहे, या झाडाला काही रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे काय, यावर काही उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे काय, या सर्व माहितीचे विश्लेषण एकत्रितपणे केले जाणार आहे. या झाडांना काही धोका आहे काय, वृक्षांच्या संरक्षणासाठी काय उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. एआय व लायडर प्रणालीवर आधारित या तंत्रज्ञानामुळे शहरातील वृक्ष संवर्धनात मोठी मदत मिळणार आहे.
या अभियानाची सुरूवात होण्यापूर्वी युरोपातून प्रायोगिक तत्वावर आणण्यात आलेल्या या वाहनाची व सेंसरची विधिवत पूजा महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली. शहरात अशा प्रकारे वृक्षांची माहिती पहिल्यांदाच संकलित केली जाणार आहे. वृक्ष संवर्धनाच्या मोहिमेत हा उपक्रम लक्षणीय ठरणार आहे.
झाडांचे हेल्थ कार्ड तयार करणार : महापौर
शहरातील वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी व त्यांची भविष्यात निगा राखण्यासाठी एआय आधारित तंत्रज्ञानाची निश्चितपणे मदत मिळणार असून यातून झाडांचे हेल्थ कार्ड तयार केले जाणार असल्याची माहिती महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी यावेळी दिली.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, या तंत्रज्ञानाने चालत्या गाडीतून झाडांचे स्कॅनिंग केले जाणार आहे. यातून झाडाचे वय किती आहे, झाडाचे खोड पोकळ आहे की भरीव आहे, हे झाड धोकादायक स्थितीत आहे काय, धोकादायक स्थितीत असल्यास त्यावर उपचाराची गरज आहे काय, यामुळे वृक्षांच्या संवर्धनासाठी वृक्षाची माहिती अत्यंत अचूकपणे संकलित करण्यास मदत होणार असल्याचे महापौर श्रीमती ठाकरे यांनी सांगितले.
एआय मदतीने विश्लेषण करणार : वैभव राजे
या एकूण तंत्रज्ञानाची माहिती ट्री को टेकचे प्रमुख श्री. वैभव राजे यांनी उपस्थितांना दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, एआय आधारित सेंसरच्या मदतीने या झाडाची माहिती संकलित केली जाणार आहे. या झाडांची सद्यस्थिती कशी आहे, या झाडाला जगविण्यासाठी औषधीची आवश्यकता आहे काय, या झाडांचे पर्यावरणीय स्थिती काय आहे, हे झाड किती प्रमाणात प्राणवायू देते, झाडाचे कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन किती आहे या वृक्षांची संरचनात्मक स्थायीत्व कसे आहे, झाड धोकादायक स्थितीत आहे काय, या बद्दल मिळणाऱ्या माहितीचे विश्लेषण एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केली जाणार असल्याचे श्री. राजे यांनी सांगितले.