प्रत्येक ९ तारखेला गर्भवती मातांची विशेष आरोग्य तपासणी
सुरक्षित मातृत्वासाठी मनपाचे आवाहन
Date : 10 Jun 2026
याप्रसंगी मनपाचे अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. ख्वाजा मोईनुद्दीन तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
गर्भवती माता व नवजात बालकांचे आरोग्य सुरक्षित राखण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला शासकीय आरोग्य संस्थांमध्ये गर्भवती महिलांची विशेष आरोग्य तपासणी केली जाते.
गर्भधारणेच्या दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहीतील महिलांसाठी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत विविध आरोग्य तपासण्या व आवश्यक मार्गदर्शन केले जाते. यामध्ये रक्त तपासणी, लघवी तपासणी, रक्तदाब तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी तसेच आवश्यकतेनुसार अल्ट्रासोनोग्राफी तपासणीचा समावेश असतो. गर्भधारणेदरम्यान उद्भवू शकणाऱ्या आरोग्यविषयक जोखमींची वेळेत ओळख करून योग्य उपचार व समुपदेशन उपलब्ध करून देणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. नियमित तपासणीमुळे माता व बालमृत्यू दर कमी करण्यास तसेच सुरक्षित मातृत्वाला चालना देण्यास मदत होते.
यावेळी मनपाचे वैद्यकीय आरोग्य सभापती श्रीमती मनीषा अतकरे यांनी शहरातील सर्व गर्भवती महिलांना प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला आपल्या जवळच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात अथवा शासकीय आरोग्य संस्थेत जाऊन मोफत आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन केले. तसेच, “प्रत्येक ९ तारखेला सर्वप्रथम विचार गर्भवती मातेचा” हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवून सुरक्षित मातृत्वासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी केले.
यावेळी मनपाच्या माता व बाळ संगोपन अधिकारी डॉ. सरला लाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत आतापर्यंत आयुष्मान आरोग्य मंदिर (AAM) व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये (UPHC) एकूण १,७०० गर्भवती महिलांची प्रसूतीपूर्व (ANC) तपासणी करण्यात आली असून, १८८ उच्च-जोखीम (High Risk) गर्भधारणा प्रकरणे निदर्शनास आली आहेत. तसेच २६१ गर्भवती महिलांना सोनोग्राफी (USG) सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.