आमराई परिसर स्वच्छतेसाठी नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
स्वयंसेवकांच्या मदतीने ८.९ टन कचरा संकलित
Date : 14 Jun 2026
यावेळी स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, विधी विशेष समिती सभापती कु. निधी तेलगोटे यांनी प्रत्यक्ष स्वच्छता मोहिमेत सहभागी होत परिसर स्वच्छतेचा संदेश दिला. मोहिमेदरम्यान कचऱ्याची योग्य विल्हेवाट, ओला-सुका कचरा वर्गीकरण आणि नागरिकांची स्वच्छतेबाबतची जबाबदारी याविषयी जनजागृती करण्यात आली.
वृक्षित फाउंडेशन मागील दहा दिवसांपासून नागरिकांच्या सहभागातून आमराई परिसरात सातत्याने स्वच्छता कार्य करीत आहे. या मोहिमेत वृक्षितचे स्वयंसेवक, स्थानिक नागरिक आणि मनपाचे अधिकारी-कर्मचारी मिळून एकूण १०७ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. या संयुक्त प्रयत्नांतून आतापर्यंत ८.९ टन कचरा संकलित करण्यात आला असून त्यापैकी ७२८ किलो कचरा स्वयंसेवकांनी हाताने गोळा केला.
यावेळी बोलताना शिवानी दाणी-वखरे म्हणाल्या, मनपा आणि वृक्षित फाउंडेशनच्या संयुक्त प्रयत्नांमुळे गेल्या काही दिवसांत आमराई परिसर मोठ्या प्रमाणात स्वच्छ करण्यात यश आले आहे. नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला आहे. ‘आपला समाज, आपले कर्तव्य’ या भावनेतून प्रत्येकाने परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्वीकारावी. कचरा उचलण्याबरोबरच तो कचरापेटीतच टाकण्याचा निर्धार सर्वांनी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कु. निधी तेलगोटे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, स्वच्छता ही केवळ प्रशासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची नागरी जबाबदारी आहे. वृक्षित फाउंडेशनने या उपक्रमाची सुरुवात केली आणि आता अनेक नागरिक स्वतःहून पुढे येऊन कचरा संकलनात मदत करीत आहेत. शहरात स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्थांना सहकार्य करून आपण सर्वांनी आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर बनवूया.
या प्रसंगी झोनल स्वच्छता अधिकारी श्री. ऋषिकेश इंगळे,श्री. रवींद्र परांजपे, क्रेडाईचे पदाधिकारी व कर्मचारी तसेच मनपाचे अधिकारी-कर्मचारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. आमराई परिसरातील हे स्वच्छता अभियान २१ जूनपर्यंत सुरू राहणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.