मुस्लिम ई-लायब्ररी व मिनीमातानगर रुग्णालयाची मनपा आयुक्तांनी केली पाहणी
संत गुलाब बाबा उर्दू शाळेची नवीन इमारत बांधण्यासह रुग्णालयात विविध सुविधा निर्माण करण्याचे निर्देश
Date : 18 Jun 2026
यावेळी नगरसेवक श्री. वसीम खान, मुख्य अभियंता श्री. मनोज तालेवार, सहायक आयुक्त श्री. घनश्याम पंधरे, विभागीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त विभागीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, कार्यकारी अभियंता श्रीमती अल्पना पाटणे, श्रीमती अश्विनी येलचेटवार, श्री. गिरीश लिखार, श्री. राजेंद्र राठोड, उपअभियंता श्री. राजीव गौतम यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी उपस्थित होते.
प्रभाग क्र. ७ मोमीनपुरा येथे जिल्हा नियोजन समितीच्या २० कोटींच्या निधीतून ४०९८.४१ चौ.मी. जागेवर जी+5(G+5) मजल्यांची मुस्लिम ई-लायब्ररीला तयार केली जात आहे. याकामाची मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी ई-लायब्ररीच्या बांधकामाची स्थिती त्यांनी जाणून घेतली. त्यानंतर येथील मल्टीपरपज हॉल व रिडिंग रूमची पाहणी केली. तसेच त्यांनी पार्किंगसाठी लोखंडी रॅम्प तयार करण्याचे व उर्वरित बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. याशिवाय त्यांनी मोमीनपुरा भागातील संत गुलाब बाबा उर्दू शाळेची पाहणी केली. तसेच मोडकळीस आलेली शाळेची इमारत तोडून शाळेकरिता नवीन इमारतीचे बांधकाम करण्याचे व पुढच्या वर्षी शाळा सुरु करण्याकरिता नवीन प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला.
त्यानंतर मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी मिनीमातानगर येथील 30 बेडच्या मनपा रुग्णालयाची (नागरी सामुदायिक आरोग्य केंद्र (यूसीएचसी) पाहणी केली. त्यांनी रुग्णालयातील बाजुचे प्रवेशद्वार मोठे तयार करण्याच्या सूचना केल्या. शिवाय रुग्णालयातील काही जागा पार्किंगसाठी राखीव ठेवण्याच्या सूचना केल्या. पार्किंग ज्या ठिकाणी करता येईल त्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक लावण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर रुग्णालयासमोर जागेचा वापर स्थानिक नागरिकांना वॉकिंग ट्रॅक, उद्यान व खेळण्याकरिता करता येईल, या पद्धतीने ती जागा विकसित करण्याच्या सूचना त्यांनी केली. याशिवाय रुग्णालयात एसी, मॉड्युलर ओटी व इफ्लूएंट ट्रीटमेंट प्लांट (ईटीएफ) तयार करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसेच रुग्णालयात चांगल्या दर्जाचे फर्निचर लावण्यात यावे व इमारतीवर 'मेडा' च्या माध्यमातून सोलर पॅनल लावण्याच्या सूचनाही त्यांनी केली.
३० खाटांची व्यवस्था
मिनीमाता नगर येथील नागरी सामुदायिक आरोग्य केंद्र (यूसीएचसी) येथे ३० खाटांची व्यवस्था असणार आहे. या रुग्णालयात ओपीडी, आयपीडी ची व्यवस्था असेल. नवजात शिशू, बालरोग, स्त्रीरोग, नेत्र, दंत यासह २४ तास आपात्कालीन सेवा, रेडिओलॉजी सेवा, शस्त्रक्रिया या सर्व सुविधा या रुग्णालयामधून दिल्या जाणार आहेत.