जागतिक योग दिनानिमित्त मनपाची जय्यत तयारी
महापौर यांनी घेतला सामूहिक योग कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा
Date : 19 Jun 2026
बैठकीत उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्ष नेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, क्रीडा सभापती श्रीमती दर्शनी धवड, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, प्र.अतिरिक्त आयुक्त श्री.मिलिंद मेश्राम, उपायुक्त श्री. निर्भय जैन, श्री. राजेश भगत, डॉ.मेघना वासनकर, श्री. गणेश राठोड, अधीक्षक अभियंता श्रीमती लिना उपाध्ये, नगररचना उपसंचालक श्री.गिरीश गोडबोले, सहायक संचालक श्री. ऋतुराज जाधव, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. तुषार बाराहाते, शिक्षणाधिकारी श्रीमती माधुरी काटकर, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, क्रीडा अधिकारी डॉ. पियूष आंबुलकर, सहायक आयुक्त सर्वश्री धनंजय जाधव, विजय थूल, राजकुमार मेश्राम, प्रमोद वानखेडे, विकास रायबोले, नरेंद्र बावनकर, घनश्याम पंधरे, वृक्ष संवर्धन श्री.अमोल चौरपगार यांच्यासह जनार्दन स्वामी मंडळ, एनसीसी, सीआरपीएफ, स्काऊट गाईडचे प्रतिनीधी यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत सर्वप्रथम प्र. अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम आणि क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर यांनी आयोजनाची माहिती दिली. त्यानंतर महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेत सर्व संस्थांच्या सूचना जाणून घेतल्या.
यशवंत स्टेडियमवर सकाळी 6.30 वाजता योगाभ्यासाची सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमात योगाभ्यासी मंडळांकडून हास्य योग, चक्र योग तसेच इतर योगांच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. कार्यक्रमात केंद्रीय परिवहन मंत्री श्री. नितीन गडकरी, महापौर श्रीमती निता ठाकरे, उपमहापौर श्रीमती लीला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, क्रीडा सभापती श्रीमती दर्शनी धवड यांच्यासह आमदार इतर समिती सभापती, नगरसेवक, तसेच जनार्दन स्वामी मंडळाचे स्वयंसेवक, योग असोसिएशनचे स्वयंसेवक, एनसीसी कॅडेट्स, सीआरपीएफ जवान, स्काऊट गाईडचे विद्यार्थी, मनपाचे सर्व अधिकारी-कर्मचारी आणि मनपा शाळांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
यावेळी महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी यशवंत स्टेडियमवर योगाभ्यासासाठी येणाऱ्या नागरिकांकरिता परिवहन सुविधा, मेट्रो सुविधा, रुग्णवाहिका (ॲम्बुलन्स) सुविधा, पिण्याचे पाणी इत्यादी सुविधा योग्यरीतीने पुरविण्याच्या सूचना केल्या. कार्यक्रमात वर्ल्ड योग चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेतलेल्या शहरातील आंतरराष्ट्रीय योग खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय शहराला स्वच्छ, सुंदर, स्वस्थ आणि हरित स्वरूप देण्याकरिता नागपूर महानगरपालिकेद्वारे पर्यावरण संवर्धन पंधरवड्यानिमित्त राबविण्यात येत असलेल्या 'विशेष स्वच्छता अभियानात' सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचा सत्कार सुद्धा यावेळी करण्यात येणार आहे.
मेट्रो सकाळी ५ वाजेपासून योगासाधकांना कार्यक्रम स्थळी येण्यासाठी सुरू करावी असे निर्देश बैठकीत महापौर निता ठाकरे यांनी दिले. तसेच आपली बसची सेवा सुविधा योगसाधकांना उपलब्ध करण्याच्याही सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
योग दिनासाठी नोंदणी करण्याचे आवाहन
जागतिक योग दिनानिमित्त रविवारी (ता.21) यशवंत स्टेडियम येथे होणाऱ्या सामूहिक योग सत्रात सहभागी होण्याकरिता नागरिकांना नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी https://yoga-census-portal.emergent.host या लिंकवर जाऊन किंवा क्युआर कोड स्कॅन करून आपली नोंदणी करण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.