सफाई कामगारांचे “श्रम साफल्य आवास” प्रकल्पाची पाहणी
मौजा-नारी येथे मनपा उभारणार 392 सदनिका : उपमहापौर लिला हाथीबेड यांच्यासह मनपा आयुक्तांनी केली पाहणी
Date : 23 Jun 2026
यावेळी झोन सभापती श्री. आसिफ शेख, नगरसेवक श्री. दिनेश यादव, माजी नगरसेवक श्री. मनोज सांगोळे, उपायुक्त श्री. गणेश राठोड, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता सुनील उईके, श्री. निलेश बोबडे, वृक्ष संवर्धक श्री. अमोल चौरपगार, झोनल स्वच्छता अधिकारी श्री. भोला खोब्रागडे, एसडीपीएलचे श्री. गौरव अग्रवाल व श्री. राहुल अग्रवाल यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
महापौर श्रीमती निता ठाकरे, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी, सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र(बाल्या) बोरकर यांच्या मार्गदर्शनात व आयुक्त डॉ. विपीन यांच्या देखरेखीत मनपाच्या सफाई कामगारांसाठी मौजा नारी येथे 2 बीएचके घरकुल योजना उभारण्यात येणार आहे. या 2 बीएचके घरकुलाचे चटई क्षेत्र 500 चौरस फूट राहणार आहे. येथे एकूण 392 सदनिकांचे बांधकाम करण्यात येणार असून 42,103.92 चौ.मी. जागेवर 'जी प्लस 7' (G+7) अशा 14 इमारती उभारण्यात येणार आहेत.
याशिवाय, नागरिकांना या आवास योजनेपर्यंत जाण्यासाठी 18 मीटर आणि 12 मीटर रुंदीच्या रस्त्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. यावेळी उपमहापौर आणि मनपा आयुक्त यांनी जागेची प्रत्यक्ष पाहणी करीत श्रम साफल्य आवास योजनेची माहिती घेतली. एसआरए कॉलनी विटाभट्टी, उपलवाडी येथून ते नारीपर्यंत प्रस्तावित डीपी मार्ग तयार करताना रस्त्यालगत नळाची पाईपलाईन टाकण्याचे निर्देश मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी दिले. तसेच या जागेच्या पर्यावरणाशी संबंधित काही प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्यास, त्याची माहिती सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत.
त्याचबरोबर, एसआरए कॉलनीमध्ये राहत असलेल्या नागरिकांसाठी आणि सफाई कामगारांसाठी तयार करण्यात येत असलेल्या कॉलनीसाठी 'एसटीपी' (सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) तयार करावा, आवास योजनेतील जागा समपातळीत करावी, झुडपे व गवत छाटावे आणि आवास योजना राबवताना जास्तीत जास्त झाडे वाचवावीत, असेही निर्देश त्यांनी दिले. डीपी रस्ता तयार करण्यासाठी येणाऱ्या अडचणीबाबत एनआयटी व इतर विभागांसोबत बैठक आयोजित करण्याचे निर्देश मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच एसआरए कॉलनीतील सेप्टिक टँकची साफसफाई नियमित करण्याचे निर्देशही यावेळी मनपा आयुक्तांनी दिले.