परिवहन विभागाचे “व्हिजन डॉक्युमेंट” तयार करा
मनपा आयुक्त डॉ. विपीन यांचे विभागाला निर्देश
Date : 01 Jul 2026
यासंदर्भात महापौर श्रीमती निता ठाकरे, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र(बाल्या) बोरकर, यांच्यासह इतर पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून 'व्हिजन डॉक्युमेंट' तयार करण्यात यावे अशी सूचना बैठकीत देण्यात आले.
मनपा मुख्यालयातील आयुक्त सभा कक्षात मनपा परिवहन विभागाची आढावा बैठक पार पडली. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, प्र.अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम, प्रशासकीय अधिकारी श्री. योगेश लुंगे, ऑपरेशन व्यवस्थापक श्री. राजीव घाटोळे, व्यवस्थापक प्रशासन श्री गजानन नागुलवार, कामगार अधिकारी श्री.अरुण पिंपुर्डे, तसेच चलो प्रोजेक्टचे प्रमुख श्री.अजय कुमार, बस ऑपरेटर्स यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी मनपाच्या परिवहन विभागातर्फे चालविण्यात येणाऱ्या आपली बस च्या माध्यमातून 'नॉन-फेअर रेव्हेन्यू' वाढविण्याची गरज असल्याचे सांगत, चांगल्या सल्लागारच्या माध्यमातून हे कामे होऊ शकते यासाठी परिवहन विभागाकरिता तातडीने सल्लागार नेमणूक करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
मनपाच्या भंगार (स्क्रॅप) बसेसचा कल्पकतेने वापर करून, मिनी लायब्ररी किंवा लहान रेस्टॉरंट खाजगी संस्थांच्या माध्यमातून सुरू करता येऊ शकतात का याचा विचार करून, मनपा मुख्यालय, आयटी पार्क, मिहान आणि मेडिकल कॉलेज परिसरामध्ये या बसेस उभ्या करून त्यांचा उपयोग लहान रेस्टॉरंटसाठी करून मनपाचे उत्पन्न वाढेल यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले.
याशिवाय एनएमआरडीए क्षेत्रात मनपातर्फे येत्या काळात दिल्या जाणाऱ्या परिवहन सेवा, तेथिल सुविधा, तसेच नागरिकांकडून आकारले जाणारे तिकीट दर याबाबींवर प्रस्तावासह संबंधित विभागांची तातडीने बैठक घेण्याचे निर्देश दिले.
महिला बचत गटांच्या माध्यमातून परिवहन कार्ड नागरिकांना देण्यात यावे आणि या कामात आशा स्वयंसेविकांची मदत घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या. शहरातील विविध मॉल्स, चित्रपटगृहे, एमआयडीसी आणि इतर गर्दीच्या भागांत परविहन कार्ड साठी स्टॉल्स लावण्यात यावे. डिजीटलल माध्यमांचा प्रभावी वापर करून बस प्रवाशांची संख्या (रायडरशिप) वाढविण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
शहराच्या कानाकोपऱ्यांत असलेल्या विविध कंपन्यांसाठी प्रीमियम बस सेवा देण्यासह विमानतळ सेवा (एअरपोर्ट सर्व्हिस) वाढविण्यात यावी, विद्यार्थ्यांना शाळांसाठी मासिक पासची सुविधा असावी, तसेच 'मेट्रो इंटिग्रेटेड सर्व्हिस'चा विस्तार करण्यात यावा, अशा विविध सूचना त्यांनी केल्या.
मनपाचे परिवहन विभागाचे उत्पन्न जास्तीत जास्त कसे वाढेल यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश देत, देशातील इतर शहरांमध्ये बसेसवर ज्याप्रमाणे जाहिराती दिल्या जातात, त्याच धर्तीवर मनपाच्या आपली बस वर खाजगी संस्थांची जाहिरात लावता यावी, यासाठी नवीन जाहिरात धोरण, होर्डिंग्ज पॉलिसी तयार करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
याशिवाय इतर शहरांमधील परिवहन सेवांच्या धोरणांचा अभ्यास करून, त्यातील चांगल्या गोष्टींचा स्वीकार करत एक उत्कृष्ट धोरण तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. नीती आयोगाच्या परिवहन विषयक चांगल्या योजनांवर सातत्याने लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
यावेळी मनपा आयुक्तांनी परिवहन विभागाचे अल्पकालीन, मध्यमकालीन, दीर्घकालीन, उद्दिष्टे निश्चित करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. याशिवाय, मनपाचे सर्व बस डेपो 'मॉनेटाईज' होऊन त्यातून मनपाला अधिक जास्त उत्पन्न मिळेल, तसेच या सर्व जागांचा उपयोग पार्किंग, पेट्रोल पंप, रेस्टॉरंट, शॉपिंग यांसारख्या व्यावसायिक कामांसाठी करून मनपाचे उत्पन्न वाढेल याकरिता लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे निर्देश निर्देश दिले. याशिवाय परिवहन विभागाची श्वेतपत्रिका काढण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. अतिरिक्त आयुक्तांना यांना परिवहन विभागाच्या विविध समस्यांवर आणि धोरणांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी महिन्यातून दोनदा बैठका घेण्याचे निर्देश मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी दिले.
मोरभवन येथे नागरी सुविधा पुरविण्यात याव्यात- परिवहन सभापती श्रीमती मंगला खेकरे
मोरभवन बस स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांसाठी बसण्याची उत्तम व्यवस्था, प्रतीक्षालय, बसच्या वेळेची माहिती देणारे डिजिटल डिस्प्ले, तसेच मोरभवन बस स्टँडच्या चारही बाजूंना आधुनिक टॉयलेट सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशा सूचना परिवहन सभापती श्रीमती मंगला खेकरे यांनी बैठकीत केल्या. याचबरोबर मोरभवन परिसराचे काँक्रीटीकरण करावे, तसेच सुशोभिकरण करण्यासाठी वृक्षारोपण करावे, शहरातील विविध बस थांब्यांवर नागरिकांना सहज दिसेल असे माहिती फलक लावण्यात यावेत, तसेच खापरी डेपोला सुरक्षा भिंत तयार करण्यात यावी, अशा विविध सूचना त्यांनी मांडल्या. यावर मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला. तसेच, खापरी बस डेपोच्या सुरक्षेसाठी तिथे लोखंडी आणि तारांचे मजबूत कुंपण लावण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.