महिन्याच्या प्रत्येक दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारला मनपाचा झोन स्तरावर तक्रारींचे निवारण दिवस
वृद्ध व दिव्यांगासाठी ई-संवाद प्रणाली विकसित करणार
Date : 03 Jul 2026
शहरातील नागरिकांना मनपाच्या कामकाजाच्या संदर्भात असलेल्या अडचणी, सेवा विषयक माहिती व समस्यांचे जलदगतीने निराकरण करण्याच्या दृष्टीकोनातून महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या संकल्पनेतून व उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे व सत्ता पक्ष नेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.
यासंदर्भात मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी परिपत्रक काढून संबंधित अधिकाऱ्यांना नागरिक तक्रार निवारण दिन साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात प्रत्येक झोनच्या सहाय्यक आयुक्तांनी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारला सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत नागरिकांच्या तक्रारींची तात्काळ निराकरण करावे. या दिवशी नागरिकांकडून प्राप्त तक्रारी व निवेदनांची स्वतंत्र नोंद घेण्यात यावी. तक्रारीचे स्वरुप पाहून तक्रारदारांना न्याय मिळवून देण्यासाठी संबंधित विभागाने पाठपुरावा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. नागरिक तक्रार निवारण दिनाच्या कार्यक्रमाला सर्व झोनचे सहाय्यक आयुक्त व संबंधित विभागाचे प्रमुखांनी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.
ई-संवाद प्रणाली विकसित करणार
काही अपरिहार्य कारणामुळे, अपंगत्वामुळे किंवा वृद्धत्वामुळे झोन कार्यालयात उपलब्ध राहू न शकणाऱ्या तक्रारदारांसाठी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहण्याची सुविधा मनपाने उपलब्ध करून दिली आहे. यासाठी ई-संवाद प्रणाली विकसित करण्याचे निर्देश मनपाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाला दिले आहेत. त्याचप्रमाणे क्यूआर कोड इतर आवश्यक सुविधा झोन कार्यालय स्तरावर पुरविण्याचे निर्देश दिले आहेत.
नियमित अहवाल सादर करणे
तक्रारी व समस्यांचे निराकरण त्वरित व्हावे, ही कार्यवाही करण्यास उशिर होणार नाही, याची दक्षत संबंधित विभागाच्या प्रमुखांनी घ्यावी. नागरिकांनी दिलेल्या ऑफलाईन व ऑनलाईन तक्रारींचा तपशील, यावर करण्यात आलेली कार्यवाही, प्रलंबित प्रकरणे, त्यामागील कारणे याबाबतचा सविस्तर अहवाल संबंधित झोनच्या सहाय्यक आयुक्तांनी मनपाच्या सामान्य प्रशासन विभागाला नियमितपणे सादर करणे सक्तीचे असल्याचे या परिपत्रकात नमूद केले आहे.