थीमवर आधारित 75 उद्याने व 75 मैदाने विकसित होणार
पहिल्या टप्प्यात 12 मैदाने व 12 उद्याने विकसित करा सत्ता पक्षनेता नरेंद्र (बाल्या) बोरकर यांचे निर्देश
Date : 06 Jul 2026
मनपाच्या ठरावानुसार महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी शहरात उद्याने व उद्याने विकसित करण्यासाठी सत्ता पक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवक व अधिकारी सदस्य असलेली उच्चस्तरिय समिती गठीत केली आहे. शहरात राबविणाऱ्या या अभिनव प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी या समितीची बैठक आज (ता. 6) डॉ. पंजाबराव देशमुख स्म़ृती स्थायी समिती सभागृहात सत्ता पक्षनेनेते तथा विशेष समिती अध्यक्ष श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीला महापौर श्रीमती निता ठाकरे, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, क्रीडा विशेष समितीच्या सभापती सौ. दर्शनी धवड, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, अतिरिक्त आयुक्त श्री. मुरगानंथम, अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम, नगरसेविका श्रीमती सुषमा चौधरी, नगरसेवक श्री. विनोद कन्हेरे, नगरसेवक श्री. विनय दाणी, नगरसेवक श्री. दिलीप दिवे, नगरसेवक श्री. संजय ठाकरे, नगरसेवक श्री. रितेश गावंडे, नगरसेवक श्री. सुनील दांडेकर, नगरसेवक श्री. श्रीकांत आगलावे, नगरसेवक श्री. सुधीर (बंडू) राऊत, नगरसेवक श्री. बाबा तायडे, उपायुक्त श्री. गणेश राठोड, उपायुक्त श्री. मंगेश खवले, वृक्षसंवर्धन श्री. अमोल चौरपगार, क्रीडा अधिकारी डॉ. पियूष अंबुलकर, पर्यावरण तज्ज्ञ श्री. दिलीप चिंचमलातपुरे यांच्यासह प्रकल्प व्यवस्थापन कन्सलटंटचे (पीएमसी) प्रतिनिधी उपस्थित होते.
नगरसेवकांचे मत विचारात घ्यावे – नरेंद्र बोरकर
केंद्रीय परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून शहराचा पायाभूत विकास करताना शहराचे सौंदर्यीकरण व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाड़ू घडविण्यासाठी चांगली मैदाने उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प पूर्णत्वात नेण्याचे मनपाने ठरविले आहे. यावेळी बोलताना सत्तापक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी उद्याने व मैदाने वेगवेगळे युनिट म्हणून विकसित करावे. उद्यानामध्ये खेळांची साहित्य किंवा साधने लावू नये तर मैदानांमध्ये बगिचामधील खेळणी व इतर साहित्याचा वापर करू नये. यामुळे मैदानाचा वापर केवळ खेळाडूंसाठी होईल तर उद्यानांचा वापर ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसाठी होईल. ज्या उद्याने व मैदानांमधील साहित्य खराब झाले आहे किंवा वापरण्यास योग्य नसलेल्या साहित्याऐवजी नवे साहित्य आणावे, यामुळे मनपाच्या देखरेखीच्या खर्चात कपात होईल. या उद्यानांचा थीमचा आधार ठरविताना पीएमसीच्या प्रतिनिधींनी संबंधित भागातील नगरसेवकांची मते विचारात घ्यावी. त्या भागातील लोकवस्ती तसेच तेथील लोकांच्या श्रद्धेचा विचारही थीम निश्चित करताना विचारात घ्यावे, असेही श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी सुचविले.
लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्र्तेयकी दोन मैदाने व उद्यानांचा अंतिम आराखडा व निश्चित करून येत्या शुक्रवारी सादर करावा, असेही निर्देश श्री. नरेंद्र बोरकर यांनी यावेळी दिले.
मेंटनन्स व नागरी सुविधांवर भर द्यावा- महापौर
यावेळी महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. उद्याने व मैदाने विकसित करताना या दोन्ही जागांचे मेंटनन्स कसे करणार याचा विचार हा प्रकल्पाचा आराखडा तयार करताना निश्चित करावा, अशी सूचना महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी केली. त्याचप्रमाणे अनेक उद्याने व मैदानांमध्ये नागरी सुविधांचा अभाव असतो किंवा या सुविधा दर्जेदार नसतात. यामुळे लोकांना अडचणींना सामोरे जावे लागते. याबाबी प्रकल्प आराखडा तयार करताना विचारात घ्याव्या, असेही महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी सुचविले. सर्व ठिकाणी वाहनांसाठी पार्किंगचे नियोजन करण्याचे निर्देश ही महापौरांनी दिले. तसेच या ठिकाणी उपलब्ध सुविधांचे देखरेख कोणता विभाग करणार आहे. याचे सविस्तर धोरण तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी क्रीडा विभागाच्या पीएमसीच्या प्रतिनिधींनी काही मैदाने व उद्यानांचे पीपीटीच्या माध्यमातून सादरीकरण केले.