पावसाळ्यात विविध विभागांनी समन्वयाने कार्य करावे : महापौर निता ठाकरे
महापौरांनी घेतली लक्ष्मीनगर झोन व धंतोली झोनच्या नगरसेवक,अधिकाऱ्यांची बैठक
Date : 06 Jul 2026
नागपूर शहरातील अवैध बांधकाम, पाणी पुरवठा, अतिक्रमण, नालेसफाई आणि सिव्हर लाईन चोकेज आदी समस्यांवर चर्चा करण्यात आली. नागपूर महानगरपालिकेच्या लक्ष्मीनगर झोन कार्यालयात झालेल्या प्रभाग क्रमांक,१६,३६,३७,३८ च्या बैठकीत मनपाच्या स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे यांच्यासह लक्ष्मीनगर झोन सभापती श्रीमती तारा (लक्ष्मी) यादव, आरोग्य समिती सभापती श्रीमती मनिषा अतकरे, स्थापना व प्रकल्प विशेष समिती सभापती श्रीमती अश्विनी जिचकार, विधी विशेष समिती सभापती कु. निधी तेलगोटे, नगरसेवक सर्वश्री दिलीप दिवे, रितेश गावंडे, अमोल शामकुळे, सुनील दांडेकर नगरसेविका श्रीमती वर्षा चौधरी, श्रीमती माया हाडे, श्रीमती कुमुदिनी गुडधे, श्री.ईश्वर ढेंगळे, श्री. संजय उगले, श्री.शैलेन्द्र डोरले, श्रीमती माहेश्वरी पटले लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त श्री. धनंजय जाधव, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
याशिवाय धरमपेठ झोन कार्यालयात झालेल्या बैठकीत स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे यांच्यासह, धरमपेठ झोन सभापती श्रीमती धनश्री देशपांडे, गलिच्छ वस्ती निर्मुलन व घर बांधणी विशेष समिती सभापती श्रीमती रुतिका मसराम, आरोग्य समिती सभापती श्रीमती मनिषा अतकरे, नगरसेविका श्रीमती साधना बरडे, श्रीमती वर्षा चौधरी, श्रीमती पुजा पाठक, श्रीमती योगिता तेलंग, नगरसेवक श्री. विनय दाणी श्री. विक्रम ग्वालबंशी, श्री. योगेश पाचपोर, श्री.केतन ठाकरे, श्री. अभिजीत झा, सहायक आयुक्त श्री. राजकुमार मेश्राम, कार्यकारी अभियंता श्री. मनोज गद्रे, श्री. श्रीकांत वाईकर उपस्थित होते.
बैठकीत सर्वप्रथम उद्यान विभाग, पाणी पुरवठा, आरोग्य, पथदीप आणि इतर विषयांवर महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी चर्चा केली. यावेळी त्यांनी नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर आणि वारंवार अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच मटण मार्केटसह इतर सर्व प्रकारच्या अतिक्रमणांवर कडक कारवाई करून संबंधितांचे साहित्य जप्त करण्याचे निर्देश देण्यात आले. महापौरांनी ज्याठीकाणी रस्त्यांचे काम सुरू आहे अशा ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बॅरिकॅडींग करण्याच्या सूचना दिल्या. यासोबतच चेंबरचे झाकण लावण्यात यावे, सीवर लाईन, जलवाहिनीच्या सुरू असलेल्या कामाबद्दल सर्व प्रकारची सुविधा करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यांनी व्हीओलीया कंपनी तर्फे होणाऱ्या असमाधानकारक पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच नगरसेवक श्री. विनय दाणी यांनी सेन्ट्रल मॉल ते काचीपुरा चौक आणि सेन्ट्रल बाजार रोड दरम्यानची पावसाळी नाली चोक असल्याची माहिती दिली.
लक्ष्मीनगर झोन समिती सभापती श्रीमती लक्ष्मी यादव यांनी नालेसफाईच्या कामात नगरसेवकांच्या सूचनांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे निर्देश दिले. नाल्याची सफाई केल्यानंतर गलिच्छ कचरा नाल्याच्या बाजूलाच अनेक दिवस पडून राहतो, याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी केली. बैठकीदरम्यान झोन सभापती श्रीमती धनश्री देशपांडे यांनी नाले सफाई, गडर लाईन चोकेज आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येचा मुद्दा उपस्थित केला. तसेच अंबाझरी तलावात येत असलेल्या एमआयडीसीतील घाण पाण्याबाबत चर्चा केली.