लक्ष्य निर्धारित करून सफाईची कामे पूर्ण करा
महापौर निता ठाकरे यांचे मनपा अधिकाऱ्यांना निर्देश
Date : 08 Jul 2026
महापौर श्रीमती निता ठाकरे दररोज झोन कार्यालयांमध्ये जाऊन पावसाळापूर्व कामाचा आढावा घेत आहेत. याच मालिकेत महापौरांनी आज (ता. 8) नेहरूनगर व गांधीबाग झोनमधील कामाचा आढावा घेतला व नगरसेवक तसेच अधिकाऱ्यांचे मत जाणून घेतले. यावेळी स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, विरोधी पक्षनेते श्री. संजय महाकाळकर, अतिरिक्त आयुक्त श्री. मुरुगानंथम, नेहरूनगर झोनच्या सभापती श्रीमती सीमा ढोमणे, आरोग्य विशेष समितीच्या सभापती श्रीमती मनीषा अतकरे, जलप्रदाय विशेष समितीच्या सभापती श्रीमती दिव्या धुरडे, नगरसेवक श्री. पिंटू झलके, नगरसेवक श्री. शकील पटेल, नगरसेविका श्रीमती मंगला गवरे, नगरसेवक श्री. शुभम मोटघरे, नगरसेविका श्रीमती शारदा बारई, नगरसेवक श्री. प्रवीण गिरे, नगरसेविका श्रीमती रजनी वानखेडे, नगरसेविका श्रीमती वर्षा डोंगरे, नगरसेविका श्रीमती तसनीम परवीन ताजी, तसेच गांधीबाग झोनच्या नगरसेविका श्री. सय्यद मुस्कान इरफान, नगरसेवक श्री. वसीम खान, नगरसेवक श्री. सिराज अंसारी, नगरसेविका श्रीमती सय्यदा अंसारी, नगरसेवक श्री. सुधीर(बंडू) राऊत, नगरसेविका श्रीमती सारिका नांदूरकर, नगरसेविका श्रीमती वैशाली उदापूरकर, नगरसेवक श्री. सचिन नाईक, नगरसेविका श्रीमती विद्या कन्हेरे, नगरसेवक श्री. संजय बालपांडे, नगरसेविका श्रीमती प्रमिला गौर, नगरसेवक श्री. कल्पक भनारकर, नगरसेविका श्रीमती कल्पना शर्मा, नगरसेवक श्री. श्रीकांत आगलावे यांच्यासह सहाय्यक आयुक्त श्री. विकास रायबोले, सहाय्यक आयुक्त श्री. घनश्याम पंधरे, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता श्री. श्रीकांत वाईकर, कार्यकारी अभियंता श्री. प्रफुल आसलकर तसेच मनपाचे इतर अधिकारी उपस्थित होते.
छायाचित्रे व व्हीडीओ नगरसेवकांना पाठवा - महापौर
महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी प्रारंभी नेहरूनगर झोनमधील कामाचा आढावा घेतला तेथील नगरसेवकांचे मत जाणून घेतली. यावेळी नगरसेवकांनी प्रामुख्याने नाले सफाई, गडरलाईनची सफाई व अतिक्रमणाचा मुद्या उपस्थित केले. विरोधी पक्षनेता श्री. संजय महाकाळकर यांनी प्रभागात वाढत असलेल्या अतिक्रमणाचा मुद्या उपस्थित केला. यावर महापौर श्रीमती ठाकरे यांनी अतिक्रमणाची कारवाई सातत्याने करून साहित्य जप्तीची कारवाई करावी, अशी सूचना केला. त्याचप्रमाणे या जप्तीच्या कारवाईचे छायाचित्रे व व्हीडीओ संबंधित नगरसेवकांना पाठविण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. सक्करदरा भागातील अतिक्रमणे हटविण्यासाठी तात्काळ नोटीस देऊन कारवाई करण्यात यावी, जप्त केलेले सामान दूरवर नेऊन ठेवावी व ते पुन्हा लागणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सुचविले. नारळ पाणी व मटन शॉपचे दुकाने लावून अतिक्रमण करणाऱ्यावर तातडीने कारवाई करून तत्काळ अहवाल सादर करावे, असेही निर्देश महापौरांनी दिले.
पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन घनकचरा व्यवस्थापन विभागाने लक्ष्य निर्धारित करून गडर लाईनची साफसफाई तसेच नाले सफाईचे कामे पूर्ण करावी, असे निर्देश यावेळी महापौरांनी दिले. तसेच प्रत्येक प्रभागात आकस्मिक पथक तयार सज्ज करावे, या पथकातील प्रमुखाचे मोबाईल क्रमांक नगरसेवकांना उपलब्ध करून द्यावे. प्रभागातील गाळ काढण्याचा पम्प चालू स्थितीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. या संदर्भात नगरसेवकांना खोटी माहिती देणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले. या झोनमध्ये सीसीटीव्हीचे जाळे वाढविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
रात्री कचरा उचलण्याची व्यवस्था करा – महापौर
गांधीबाग झोनमध्ये अनेक व्यावसायिक प्रतिष्ठाने असल्याने या भागात रात्री सुद्धा कचरा उचलण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाने व्यवस्था सुरू करावी, असे निर्देश महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी दिले. गांधीबाग झोनमधील नगरसेवकांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद झाल्यानंतर दुकानदार बाहेर कचरा टाकत असल्याने रस्त्यावर घाण होते, हे टाळण्यासाठी याभागात कचरा रात्री उचलण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या भागातील फूटपाथवर केलेली अतिक्रमणे काढण्यासाठी कारवाई करण्याची सूचना करण्यात आली. या भागात असलेले फूटपाथ लहान करून वाहतूक सुरळीत करता येईल काय, यावरही प्रशासनाने विचार करावा, अशी सूचना महापौरांनी यावेळी केली. या झोनमध्ये सिमेंट रस्त्यांसाठी असलेला निधी गडर लाईनसाठी वळविण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक श्री. सुधीर (बंडू) राऊत यांनी केली. तसेच या भागातील शिकस्त झालेल्या इमारतीच्या मालकांना केवळ पावसाळ्यात नोटीस देऊ नये, ही कारवाई वर्षभर करण्यात यावी. पावसाळ्यापूर्वी नोटीस दिल्यानंतर ते पावसाळ्याचा मुद्या उपस्थित करून शिकस्त इमारत खाली करण्यास नकार देत असल्याचे नगरसेवकांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.