आज मनपाचा झोन स्तरावर तक्रारींचे निवारण दिवस
Date : 10 Jul 2026
शहरातील नागरिकांना मनपाच्या कामकाजाच्या संदर्भात असलेल्या अडचणी, सेवा विषयक माहिती व समस्यांचे जलदगतीने निराकरण करण्याच्या दृष्टीकोनातून महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या संकल्पनेतून व उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे व सत्ता पक्ष नेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.
यासंदर्भात मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी परिपत्रक काढून संबंधित अधिकाऱ्यांना नागरिक तक्रार निवारण दिन साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात प्रत्येक झोनच्या सहाय्यक आयुक्तांनी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारला सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत नागरिकांच्या तक्रारींची तात्काळ निराकरण करावे. या दिवशी नागरिकांकडून प्राप्त तक्रारी व निवेदनांची स्वतंत्र नोंद घेण्यात यावी. तक्रारीचे स्वरुप पाहून तक्रारदारांना न्याय मिळवून देण्यासाठी संबंधित विभागाने पाठपुरावा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. नागरिक तक्रार निवारण दिनाच्या कार्यक्रमाला सर्व झोनचे सहाय्यक आयुक्त व संबंधित विभागाचे प्रमुखांनी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.