गटरलाईनसह नालेसफाईची कामे तातडीने पूर्ण करावी
महापौर निता ठाकरे यांनी घेतला आशीनगर झोनचा आढावा
Date : 13 Jul 2026
महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी आशीनगर झोन कार्यालयात नगरसेवक व अधिकाऱ्यांशी चर्चा करून पावसाळापूर्व कामाचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, अतिरिक्त आयुक्त श्री. मुरुगानंथम एम., वैद्यकीय सेवा आणि आरोग्य विशेष समिती सभापती श्रीमती मनिषा अतकरे, झोन सभापती श्री.असिफ शेख, नगरसेवविका श्रीमती भावना लोणारे, श्रीमती सोफिया शेख (मांडवा), श्रीमती अलिशा फहीम खान, श्रीमती रेखा पाटील, श्रीमती संगीता पाटील, श्रीमती सायमा फैयाज कुरेशी, श्रीमती कल्पना द्रोणकर, गट नेता श्री असलम खान मुल्ला, नगरसेवक सर्व श्री. अभिषेक शंभरकर, श्री. दिनेश यादव, श्री. मनीष बनसोड, श्री. किरण मनपिया, श्री.पवन कोये, श्री.अंसारी मोहम्मद मुजतबा, उपायुक्त राजेश भगत, श्री. गणेश राठोड, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता श्री. श्रीकांत वाईकर, श्री. निलेश बोबडे, झोनल स्वच्छता अधिकारी श्री. भोला खोब्रागडे यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
सर्वप्रथम महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी नेहरूनगर झोनमधील कामांचा आढावा घेऊन स्थानिक नगरसेवकांची मते जाणून घेतली. यावेळी झोन सभापती श्री.असिफ शेख यांनी झोन मधील समस्यांची माहिती महापौरांना दिली. या बैठकीत नगरसेवकांनी प्रामुख्याने नालेसफाई, गडरलाईनची स्वच्छता आणि अतिक्रमणाचा मुद्दा, प्रभागातील मैदाने, शाळा व रस्त्यांवर कचरा टाकत असल्याच्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
कामगारनगर येथील नाल्यांवरील मनपाच्या जागेत पिशवी तयार करणाऱ्या एका कंपनीने अतिक्रमण केले असून, नाल्यात कचरा टाकल्यामुळे पावसाचे पाणी आजूबाजूच्या परिसरात शिरून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचा प्रश्न सर्वच नगरसेवकांनी उपस्थित केला. यावेळी वैद्यकीय सेवा आणि आरोग्य विशेष समिती सभापती श्रीमती मनिषा अतकरे यांनी एनडीएस मार्फत संबंधित कंपनीला दंड ठोठावून व नोटीस बजावून एनआयटी आणि मनपाने संयुक्त कारवाई करण्याचे निर्देश दिले.
बैठकीत सी अँड डी वेस्ट उचलणे, पावसाळ्यानंतर सर्व विहिरींची साफसफाई करणे आणि विशेषतः शिवमंदीर व जी. एम. बनातवाला शाळेतील विहिरींची तात्काळ सफाई करण्याचे निर्देश महापौर यांनी दिले. आशीनगर झोन कार्यालयात रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना लागू करावी अशा सूचना त्यांनी केल्या. गडरलाईनचे पाणी विहिरींमध्ये जाऊन भूजल दूषित होऊ नये, म्हणून तात्काळ उपाययोजना कराव्यात, असे निर्देश महापौरांनी यावेळी दिले. याशिवाय ओसीडब्ल्यूने सिमेंट रस्ता तोडून पाईपलाईन टाकल्याने त्या रस्त्यांचे तात्काळ पुनर्भरण करावे, चेंबर्सची साफसफाई करावे, अतिक्रमणधारकांना नोटीस बजावावी आणि पिवळ्या नदीवरील एसटीपीचे दरवाजे स्वयंचलित होतील याची तपासणी करावी, असेही सूचना त्यांनी केल्या.
नगरसेवकांना सफाई कर्मचाऱ्यांची यादी तात्काळ उपलब्ध करून द्यावी, पावसाळ्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांची आणीबाणी पथकाची व्यवस्था करावी आणि प्रभाग समितीच्या निधीतून नगरसेवकांना कामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना महापौर यांनी अधिकाऱ्यांना केल्या. इतर विभागांतील कर्मचाऱ्यांचे रिशफलिंग करण्यात येईल आणि कामात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा महापौरांनी दिला.
तसेच एजी आणि बीव्हीजने करारानुसारच कामे करावीत, सुखा व ओल्या कचऱ्याचे योग्य वर्गीकरण व्हावे, मैदाने व शाळांच्या ठिकाणी कचरा टाकू नये आणि कचऱ्याचे 'ब्लॅक स्पॉट्स' कमी करण्यात यावेत, असे निर्देश महापौर यांनी दिले. याशिवाय सफाई गाड्यांची दैनंदिन फिटनेस तपासणी करावी आणि सफाई वाहनांवर प्रत्येक घरापर्यंत पोहोचून नागरिकांना त्याची माहिती मिळेल, यादृष्टीने योग्य उपाययोजना करून अधिकारी यांनी नगरसेवकांना विश्वासात घेऊन सर्वांनी समन्वयाने काम करावे असेही महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी निर्देश दिले.