रक्षा बंधन दिनी महिलांसह त्यांच्या 10 वर्षापर्यंत मुलां-मुलींना मोफत प्रवास
मनपाच्या परिवहन समितीच्या बैठकीत बहुमताने प्रस्तावाला मंजुरी
Date : 14 Jul 2026
मनपाच्या आपली बस' सेवेअंतर्गत सोमवारी प्रवासीसंख्येने २.८ लाखांचा टप्पा गाठल्याबद्दल परिवहन समिती सभापती श्रीमती मंगला खेकरे आणि समिती सदस्यांनी परिवहन विभागाचे अभिनंदन केले. पुढच्या वेळी आपण ३ लाखांची प्रवासीसंख्या गाठू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यासोबतच, समिती सदस्यांनी विभागाला दिलेल्या पत्रांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश देत, केलेल्या कारवाईचे उत्तर थेट सभापतींकडे पाठवावे, अशा सूचना त्यांनी परिवहन विभागाला दिल्या. " >
मनपाच्या परिवहन समितीची बैठक सभापती श्रीमती मंगला खेकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता. 14) डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समितीच्या सभागृहात पार पडली. या बैठकीला समितीचे सदस्य श्री. सुधीर (बंडु) राऊत, श्री. विजय होले, श्रीमती प्रमिला मथरानी, श्रीमती मंगला मस्के, श्रीमती रुपाली ठाकूर, श्रीमती पूजा पाठक, श्री. शैलेश पांडे, श्री. दिनेश यादव, श्री. शकील पटेल यांच्यासह प्र. अतिरिक्त आयुक्त तथा परिवहन व्यवस्थापक श्री. मिलिंद मेश्राम, प्रशासकीय अधिकारी श्री. योगेश लुंगे, ऑपरेशन व्यवस्थापक श्री. राजीव घाटोळे, श्री गजानन नागूलवार, श्री अरुण पीपरुदे, श्री पारशर, श्री चौलवार यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
मनपाच्या परिवहन विभागातर्फे बस सेवा सुधारण्यासाठी 'एआय आधारित ऑटोमॅटिक पॅसेंजर काउंटिंग सिस्टीम' लागू करण्याचा प्रस्ताव समितीने मंजूर केला. या प्रणालीमुळे प्रवाशांची संख्या अचूक मोजणे, उत्पन्न गळती रोखणे आणि मार्गांचे नियोजन सुधारणे शक्य होणार आहे. तसेच, मिनी डिझेल बसेसचे सीएनजी बसेसमध्ये रूपांतर करण्याच्या प्रस्तावालाही समितीने मंजुरी दिली.
यावेळी समिती सदस्यांनी मनपाच्या सर्व बसेसच्या तपासणीसाठी सर्वपक्षीय समिती गठित करण्याची मागणी केली. यामध्ये ज्या बसेसची स्थिती चांगली असेल त्या चालू ठेवाव्यात आणि ज्या बसेसची स्थिती अत्यंत वाईट असेल त्या भंगारात टाकाव्यात, अशा सूचना समिती सदस्य श्री. शैलेश पांडे यांनी केल्या.
बैठकीत एनएमआरडीएच्या अंतर्गत विस्तारत असलेल्या ७ मार्गांवर ११ नवीन बसेसद्वारे सेवा सुरू करणे, तसेच शहरात विविध ठिकाणी 'बस निवारे' उभारणे या प्रस्तावालाही समितीने मंजुरी दिली.यावेळी समिती सदस्य श्री. सुधीर राऊत यांनी, 'बस निवारेच्या जागेची योग्य शहानिशा करून आणि स्थानिक नागरिकांचे हमीपत्र घेऊनच बस निवारा उभारण्यात यावे, अशी सूचना परिवहन विभागाला केली.
परिवहन विभागातर्फे शहर बस, बस निवारे, बस आगार (डेपो), बस टर्मिनल यांसह परिवहनाशी संबंधित विविध पायाभूत मालमत्तांचे संचालन व व्यवस्थापन केले जाते. त्यामुळे उत्पन्न वाढवण्यासाठी 'जाहिरात धोरण' लागू करण्याच्या प्रस्तावास समितीने मान्यता दिली.
यावेळी समिती सदस्य श्री. सुधीर (बंडू) राऊत यांनी जाहिरातींसाठी 'पीएम ई-बस' ऐवजी जुन्या बसेसना अधिक प्राधान्य देण्यात यावे, अशी सूचना केली. तर, नवीन पीएम ई-बसेसमध्ये डिजिटल जाहिराती प्रसिद्ध कराव्यात, अशी सूचना समिती सदस्य श्री. विजय होले यांनी केली. तसेच, रक्षाबंधनानिमित्त २८ ऑगस्ट रोजी महिलांना आणि त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या १० वर्षांपर्यंतच्या मुलांना शहर बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा देण्याचा निर्णयही समितीने मंजूर केला.
'स्त्री महाशक्ती' उपक्रमांतर्गत मनपाच्या परिवहन विभागाच्या दोन भंगार बसेसचा वापर महिलांसाठी स्वच्छ व वातानुकूलित शौचालये, स्तनपान कक्ष आणि रोजगार निर्मितीसाठी करण्यात येणार आहे. ही जागा 'ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन'ला उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाला समितीने मान्यता दिली. तसेच, स्थायी समितीने या लोकोपयोगी उपक्रमासाठी एकूण ८ बसेसची मागणी केली होती. त्यापैकी ५ बसेस स्वयंसेवी संस्थांना प्रायोगिक तत्त्वावर मोफत (निःशुल्क) स्वरूपात रेस्टॉरंट, रिटेल शॉप, सार्वजनिक मिनी लायब्ररी आणि कॅफे उभारण्यासाठी उपलब्ध करून देण्यास मंजुरी देण्यात आली.याशिवाय, वाठोडा येथील ई-बस चार्जिंग स्टेशनसाठी ३३ केव्ही (KV) एचटी अंडरग्राउंड केबल टाकण्याच्या ₹७३ लाख ६७ हजार ४७ या अतिरिक्त खर्चालाही समितीने मंजुरी दिली.तसेच, बस स्टॉप साईनेजचे सुधारित डिझाइन करणे आणि 'मेसर्स अमर एंटरप्रायझेस' यांना करारातील अटींनुसार काम करण्यास समितीने मंजुरी दिली. मनपातर्फे शहरातील एकूण १,६५० बस स्टॉपपैकी पहिल्या टप्प्यात ५०० आणि उर्वरित १,१५० बस स्टॉप टप्प्याटप्प्याने उभारले जाणार आहेत. या नवीन बस स्टॉपवर प्रवाशांची सुरक्षितता, एलईडी (LED) रूट माहिती आणि क्यूआर (QR) कोड यांसारख्या आधुनिक सुविधांचा समावेश असेल. संपूर्ण शहरातील सर्व बस स्टॉपवर एकसमान डिझाइन लागू केले जाणार आहे.
यावेळी समिती सदस्य श्री. शकील पटेल यांनी, "आमदार आणि खासदारांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये ज्या प्रकारे प्रवासाची सुविधा दिली जाते, तशीच सुविधा मनपाच्या 'आपली बस' सेवांमध्येही देण्यात यावी, अशी मागणी केली.
प्रवासीसंख्या २.८ लाखांपर्यंत पोहोचल्याने सभापतींकडून परिवहन विभागाचे अभिनंदन
मनपाच्या आपली बस' सेवेअंतर्गत सोमवारी प्रवासीसंख्येने २.८ लाखांचा टप्पा गाठल्याबद्दल परिवहन समिती सभापती श्रीमती मंगला खेकरे आणि समिती सदस्यांनी परिवहन विभागाचे अभिनंदन केले. पुढच्या वेळी आपण ३ लाखांची प्रवासीसंख्या गाठू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यासोबतच, समिती सदस्यांनी विभागाला दिलेल्या पत्रांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश देत, केलेल्या कारवाईचे उत्तर थेट सभापतींकडे पाठवावे, अशा सूचना त्यांनी परिवहन विभागाला दिल्या.