सार्वजनिक शौचालय ठिकाणी सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही लावा: महापौर निता ठाकरे
Date : 15 Jul 2026
यावेळी बैठकीत उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्ष नेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती श्रीमती मनिषा अतकरे, कर आकरणी व कर संकलन विशेष समिती सभापती श्रीमती सरिता कावरे, उपसभापती श्री. सुनील हिरणवार, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता श्री. कमलेश चव्हाण, श्री. प्रविण कोटांगळे, उपअभियंता श्री. सचिन चमाटे, श्री. देवेंद्र भोवते यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नागपूर शहरातील विविध भागांत नागरिकांच्या सुविधेसाठी ३६ स्मार्ट टॉयलेट्स तयार करण्यात येणार आहेत. याचसोबत, शहरातील सध्याच्या सार्वजनिक शौचालयांच्या देखभालीचे व संचालनाचे काम मल्टीपर्पज, युनिव्हर्सल सर्विसेस, आर्यभट्ट सेवा, सुलभ इंटरनॅशनल आणि श्रीमो इत्यादी संस्थांद्वारे करण्यात येत आहे. याशिवाय, 'स्वच्छ भारत मिशन २.०' अंतर्गत फुटाळा, मानकापूर, मंगळवारी बाजार, हितवाद प्रेसजवळ, पारडी, गांधीबाग आणि सतरंजीपुरा अशा सात ठिकाणी 'आकांक्षी शौचालये' तयार करण्यात येत असल्याची माहिती मनपाचे कार्यकारी अभियंता श्री. कमलेश चव्हाण यांनी महापौर यांना दिली.
यावेळी महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी शहरातील सर्व शौचालयांचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी शहरातील नादुरुस्त शौचालयांची अचूक संख्या सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. आवश्यकतेनुसार नादुरुस्त शौचालयांची तातडीने दुरुस्ती करण्यासह उद्याने, मैदाने व इतर सार्वजनिक ठिकाणच्या शौचालयांच्या योग्य देखभालीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, क्रीडा विभाग आणि उद्यान विभागाने परस्पर समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश त्यांनी दिले. शहरात मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक शौचालयांची नितांत गरज असून, बाजारपेठेच्या भागात जास्तीत जास्त शौचालये उभारून आवश्यकतेनुसार ती 'पे अँड युज' तत्त्वावर चालवण्याच्या सूचना त्यांनी केल्या. याशिवाय, पादचाऱ्यांना चालताना अडथळा होऊ नये म्हणून फुटपाथवर कुठेही टॉयलेट उभारू नयेत, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सध्या बंद असलेली शौचालये त्वरित सुरू करण्याचे त्यांनी दिले. याशिवाय त्यांनी सार्वजनिक जागा, मैदाने आणि उद्याने येथील सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती व नवीन बांधकाम झाल्यानंतर, नागरिकांना त्यांचा योग्य वापर करता यावा आणि त्यांचे सुयोग्य संचालन व्हावे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, क्रीडा विभाग व उद्यान विभागाने आपसात समन्वय ठेवून काम करण्याचे निर्देश दिले.
तसेच, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे यांनी स्मार्ट टॉयलेट्सचे डिझाईन अधिक आकर्षक व सोयीस्कर करण्याच्या सूचना केल्या. सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी योग्य जागा शोधून कमीत कमी जागेत उत्तम दर्जाची शौचालये तयार करण्याचे सुचवले, याशिवाय ट्रान्पोर्टनगर येथे शौचालय तयार करण्याच्या सूचना केल्या. तसे वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती श्रीमती मनीषा अतकरे यांनी सार्वजनिक शौचालयांच्या साफसफाईकडे अधिक लक्ष देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.