हंगामी इन्फ्लुएंझा ए (एच1एन1) बाबत सतर्क रहा
मनपाचे नागरिकांना आवाहन
Date : 22 Jul 2026
वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वाईन फ्लू मृत्यू विश्लेषण (H1N1 Death Audit Committee) समितीची बैठक मनपा मुख्यालयात पार पडली.
यावेळी बैठकीत सहा. संचालक आरोग्य सेवा, नागपूर मंडळ डॉ. नयना दुपारे, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील मेडिसिन विभागाच्या तज्ज्ञ डॉ. नेहा निखाडे, खासगी सुपर स्पेशालिटी रुग्णालयांचे तज्ज्ञ डॉ. दीपक जेसवानी, डॉ. शुभम चव्हाण, मनपाचे अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे तसेच मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिट (MSU) चे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. संदीप भोयर, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. मिथुन खेरडे, सहाय्यक सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. शुशांकी कापसे उपस्थित होते.
समितीने दोन रुग्णांच्या वैद्यकीय नोंदी, प्रयोगशाळा तपासण्या, उपचार पद्धती, सहव्याधी (Comorbidities), रुग्णालयीन व्यवस्थापन तसेच मृत्यूची कारणमीमांसा यांचा सखोल आढावा घेतला. समितीतर्फे एका रुग्णाचा मृत्यू एच1एन1 संसर्गामुळे झालेला मृत्यू म्हणून मान्य करण्यात आला. तर सहव्याधी असल्यामुळे उपलब्ध वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे दुसरा मृत्यू एच1एन1 मुळे मृत्यू म्हणून झाला नसल्याचे मान्य केले.
नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन
एच1एन1 हा विषाणूजन्य श्वसन संसर्ग असून बहुतेक रुग्ण योग्य वेळी उपचार घेतल्यास पूर्णपणे बरे होतात. तरी खालील व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी :
1. ज्येष्ठ नागरिक
2. गर्भवती महिला
3. पाच वर्षांखालील बालके
4. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मूत्रपिंडाचे आजार, फुफ्फुसाचे आजार किंवा प्रतिकारशक्ती कमी असलेले रुग्ण.
ताप, सर्दी, खोकला, घसा दुखणे किंवा श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे दिसताच विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. स्वतःहून औषध घेणे टाळावे.
नागपूर महानगरपालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजना
1. शासकीय व खासगी रुग्णालयांमधील ILI व SARI रुग्णांवर सातत्याने देखरेख.
2. सर्व एच1एन1 रुग्णांचे दैनंदिन निरीक्षण व अहवाल संकलन.
3. खासगी रुग्णालयांना संशयित व पुष्टी झालेल्या रुग्णांची त्वरित माहिती देण्याबाबत सूचना.
4. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार व संसर्ग नियंत्रण उपाययोजनांची अंमलबजावणी.
5. आवश्यक औषधे व उपचार सुविधांची उपलब्धता.
6. जनजागृती व आरोग्य शिक्षण कार्यक्रम.
7. प्रत्येक एच1एन1 मृत्यूचे वैद्यकीय लेखापरीक्षण करून उपचार व्यवस्थेत आवश्यक सुधारणा.
नागरिकांना आवाहन
घाबरून न जाता सतर्क राहा. लक्षणे दिसताच त्वरित उपचार घ्या. विशेषतः सहव्याधी असलेल्या व्यक्तींनी उपचारात कोणताही विलंब करू नये. वेळेवर निदान व उपचार हेच एच1एन1 पासून गंभीर गुंतागुंत टाळण्याचे सर्वात प्रभावी साधन आहे.