उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करा
महापौर निता ठाकरे यांनी घेतला विविध प्रकल्पांचा आढावा
Date : 23 Jul 2026
मा. महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी गुरुवारी (ता.२३) मनपा मुख्यालयातील महापौर सभाकक्षात मनपा आयुक्त डॉ. विपीन यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेऊन शहरात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांची सद्यस्थिती तसेच प्रस्तावित विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. याप्रसंगी स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, मनपाच्या मुख्य अभियंता श्रीमती लीना उपाध्ये, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, अधीक्षक अभियंता श्री. अनिल गेडाम, प्रकल्प अभियंता श्री. राजीव गौतम, कार्यकारी अभियंता श्रीमती अल्पना पाटणे, कार्यकारी अभियंता श्रीमती अश्विनी येलचटवार प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीत शहरातील उत्पन्नाचे स्त्रोत वाढविणे तसेच नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे निर्देश महापौरांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी त्यांनी महिलांसाठी जयताळा येथे उभारण्यात येणाऱ्या वर्किंग वूमेस हॉस्टेलची उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. याशिवाय देवडिया हॉस्पिटल, मिनी माता रुग्णालय, श्री.लक्ष्मी नारायण शिव मंदिर संकुल, भांडेवाडी येथील श्वान दहनघाट, नंदग्राम प्रकल्प, विद्यार्थांसाठी उभारण्यात येणारी मोमिनपुरा ई-लॅब्ररी, मनपाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त करण्यात येणाऱ्या सौदर्यीकरण बाबत सविस्तरपणे आढावा घेतला.