मुसळधार पावसाने बाधितक्षेत्राची महापौर व अधिकाऱ्यांनी केली पाहणी
स्थायी समितीच्या सभापतींनी घेतला विविध भागांचा आढावा
Date : 29 Jul 2026
मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने अनेक शाळांमध्ये व वस्तींमध्ये पाणी जमा झाले होते. या शाळांमधील विद्यार्थ्यांना मनपाच्या अग्निशमन व आपात्कालिन सेवा विभागाच्या जवानांनी सुरक्षित बाहेर काढून बचावकार्य पूर्ण केले. हुडकेश्वर-नरसाळा या भागात अतिवृष्टीने नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागले होते. या भागाला महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी भेट देऊन अधिकाऱ्यांना नागरी सुविधा पूर्ववत करण्याच्या सूचना केल्या होत्या. शहरातील लक्ष्मीनगर, दीक्षाभूमी, गोपालनगर, सहकार नगर, पडोळे चौक, संभाजी चौक, गायत्रीनगरासह नरसाळा, हुडकेश्वर शहरातील विविध भाग जलमय झाला होता. मनपाच्या अग्निशमन व आपात्कालिन सेवा विभाग व घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचार्यांनी रस्ते व भुयारी मार्ग मध्ये साचलेले पाण्याचा निचरा करण्यात यश मिळविले.
स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे यांनी बाधित क्षेत्राचा दौरा करून आढावा घेतला व अधिकार्यांना योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. शाळा व वस्ती परिसरात सुरू असलेल्या बांधकाम किंवा रस्त्यांची कामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. ज्या भागात झाडे कोसळली आहेत तसेच गाळ साचला आहे. तो काढून नागरिकांच्या वाहतुकीमध्ये काही अडचण येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश श्रीमती दाणी-वखरे यांनी दिले.
मंगळवारला झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक रस्ते तसेच भुयारी मार्ग बंद झाले होते. परंतु अग्निशमन विभाग व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जवानांच्या सहाय्याने हे सर्व मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा सुरळीत झाल्याचे श्री. बारहाते यांनी सांगितले.