बीएलओ व नगरसेवकांनी समन्वयाने एसआयआरचे काम करावे महापौर निता ठाकरे यांचे आवाहन
कचरा गाड्यांवरून एसआयआरबद्दल ध्वनीफितीने जनजागृती करावी
Date : 05 Aug 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आज डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी महापौर श्रीमती निता ठाकरे होत्या. यावेळी व्यासपीठावर उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, नगरसेवक श्री. मनोज साबळे, नगरसेवक श्री. विवेक निकोसे, नगरसेवक श्री. शेषराव गोतमारे, नगरसेवक श्री. किरण मनपिया उपस्थित होते. या बैठकीला शहरातील बीएलओ व सर्व राजकीय पक्षांचे नगरसेवक उपस्थित होते.
शहरातील एसआयआरचे काम पुढील १० दिवसात पूर्ण करावयाचे आहे, हे उद्दीष्ट ठेऊन सर्वांनी काम करण्याची आवश्यकता आहे. बीएलओची जबाबदारी ही प्राथमिक आहे. यासाठी बीएलओने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. या कामासाठी शहरातील नगरसेवक मदत करतील. नगरसेवकांनी यासाठी मदत करणे हे बीएलओसाठी पूरक ठरणार आहे. हे कोणत्याही एका पक्षाचे किंवा एका व्यक्तीचे काम नाही. सर्व पात्र नागरिकांचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट झाले पाहिजे, याची खबरदारी घेण्याची जबाबदारी ही बीएलओची आहे. पुढील १० दिवसात ही यादी १०० टक्के पूर्ण झाली पाहिजे. बीएलओंना मदत करण्याच्या संदर्भात नगरसेवकांना आवाहन केले जाईल, असेही महापौर श्रीमती ठाकरे यांनी सांगितले.
कचरा गाड्यांवरून माहिती द्या - महापौर
मनपाच्या कचरा संकलन करणार्या कचरा गाड्यांवरून एसआयआरच्या संदर्भात जनजागृती करणारी माहिती ध्वनीफितीद्वारे देण्यात यावी, असे निर्देश महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी यावेळी दिले. कचरा गाड्या या घरोघरी जात असल्याने नागरिकांना या संदर्भात माहिती मिळेल व जनजागृती होण्यास मदत होईल, असेही श्रीमती ठाकरे यांनी यावेळी सांगितले.