नागपूरच्या क्रीडा व पर्यावरण विकासासाठी मनपाची मोठी झेप
महापौरांचा ऑलिम्पिक दर्जाच्या सुविधा उभारण्यावर भर
Date : 05 Aug 2026
बैठकीत उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, सत्तापक्ष नेते तथा मैदान व उद्यान प्रकल्प विशेष समिती अध्यक्ष श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, क्रीडा विशेष समितीच्या सभापती श्रीमती दर्शनी धवड, उपायुक्त श्री. गणेश राठोड, उपायुक्त श्री. मंगेश खवले, वृक्ष संवर्धक समितीचे श्री. अमोल चौरपगार, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर तसेच विविध संस्थांचे प्रतिनिधी, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (PMC) आणि मनपाचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून शहराचा पायाभूत विकास, सौंदर्यीकरण तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी अत्याधुनिक क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात येत असल्याचे श्री. बोरकर यांनी सांगितले.
बैठकीत दाभा मैदान, कान्हेरे मैदान, पांडे ले-आऊट मैदान, दिघोरी मैदान, रमाबाई उद्यान, भारत माता उद्यान, खोंडे उद्यान, निर्मल नगरी उद्यान आदी मैदाने व उद्यानांच्या विकास आराखड्यांचे सादरीकरण करण्यात आले. सादरीकरणानंतर महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी मैदाने ऑलिम्पिक दर्जाच्या निकषांनुसार विकसित करण्यावर भर द्यावा, जेणेकरून स्थानिक खेळाडूंना उच्च दर्जाच्या सुविधा मिळतील, अशा सूचना दिल्या. उद्याने व मैदाने विकसित करताना त्यांच्या देखभाल व व्यवस्थापनासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याचे, सर्व ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्याचे, तसेच नागरिकांना आवश्यक असलेल्या दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. प्रत्येक उद्यानात रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली आणि स्वच्छतागृहाची सुविधा अनिवार्यपणे उपलब्ध करून देण्याचे सक्त निर्देशही माननीय महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी यावेळी दिले.
मनपाच्या ठरावानुसार शहरातील उद्याने व मैदाने विकसित करण्यासाठी सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवक व अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. यावेळी श्री. बोरकर यांनी प्रत्येक उद्यान स्वतंत्र संकल्पनेवर (थीम) विकसित करण्याबरोबरच उद्यानांमध्ये पर्यावरण संवर्धन करून भरपूर हिरवळ, आकर्षक प्रवेशद्वार, उत्कृष्ट लँडस्केपिंग आणि नागरिकांच्या अपेक्षांनुसार थीम निश्चित करण्याच्या सूचना दिल्या. संबंधित भागातील नगरसेवक आणि नागरिकांच्या सूचनांचा विचार करूनच अंतिम आराखडा तयार करण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे यांनी भविष्यात राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करता येईल, या दृष्टीने क्रीडा मैदाने मोठ्या आकाराची व सर्व सुविधांनी सुसज्ज विकसित करण्याचे निर्देश दिले. शहरातील क्रीडा संस्कृतीला चालना देतानाच नागरिकांना दर्जेदार उद्याने व विरंगुळ्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
सादरीकरणामध्ये स्विमिंग पूल, बास्केटबॉल कोर्ट, टेनिस कोर्ट, कबड्डी मैदान, मल्लखांब, व्हॉलीबॉल कोर्ट, मुलांसाठी खेळ क्षेत्र, जॉगिंग ट्रॅक, फाउंटन, रॉक क्लायम्बिंग, अॅम्पीथिएटर, ग्लो गार्डन, रॉक गार्डन, बॉटनिकल उद्यान, जिम हॉल, झुंबा हॉल आदी अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे मैदानांचा व उद्यानांचा समावेश करण्यात आला होता. या सुविधांमध्ये आवश्यक बदल करून नागरिकांसाठी अधिक उपयुक्त घटकांचा समावेश करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. महाल भागात मध्य भारतातील पहिले ओलंम्पिक निकषांचा स्वामिंग पूल तयार करण्यात येणार असून तेथे जिम्नॅशियम देखील प्रस्तावित आहे.