दिव्यांगांना शिक्षण, आरोग्य व रोजगार देण्यासाठी कटिबद्ध मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
जयपूर फूट साहित्य व सहायक साधने मोजमाप व वाटप शिबीराचा समारोप
Date : 10 Aug 2026
मुख्यमंत्री कार्यालय, मनपा, भगवान महावीर विकलांग सहायता समिती, नागपूर जिल्हा परिषद, नागपूर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व टाटा ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने गेल्या 7 ऑगस्टपासून कविवर्य सुरेश भट सभागृहात सुरू झालेल्या जयपूर फूट साहित्य व सहायक साधने, मोजमाप व वाटप शिबीराचा समारोप मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (ता. 10) झाला. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्याहस्ते दिव्यांगांना जयपूर फूट व सहायक साधनांचे वितरण करण्यात आले. व्यासपीठावर राज्याचे महसूल मंत्री व पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, अर्थ व नियोजन राज्यमंत्री श्री. आशीष जयस्वाल, महापौर श्रीमती निता ठाकरे, आमदार श्री. कृपाल तुमाने, आमदार प्रा. संजय भेंडे, आमदार डॉ. राजीव पोद्दार, आमदार श्री. मोहन मते, आमदार चरणसिंग ठाकूर, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, आयुक्त डॉ. विपीन, मुख्यमंत्री कार्यालयातील सहसचिव आशा पठाण, जिल्हाधिकारी श्री. कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनायक महामुनी, माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त श्री. मुरुगानंथम, अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम, एमआयएमचे गटनेता श्री. शकील पटेल, मुस्लिम लिगचे गटनेता असलम मुल्ला खान, शिवसेना (उबाठा) गटनेता किशोर कुमेरिया, शिवसेनेचे गटनेता श्री. गणेश चर्लेवार, बसपाच्या गटनेत्या श्रीमती हर्षला जयस्वाल, मा्जी आमदार श्री. नाना शामकुळे, महिला व बालकल्याण विशेष समिती सभापती श्रीमती सारिका नांदुरकर, नगरसेवक श्री. श्रीकांत आगलावे, जयपूर फूट सहायता समितीचे प्रमुख श्री. पी. आर. मेहता, स्थापत्य समितीच्या सभापती श्रीमती अश्विनी जिचकार, नगरसेवक श्री. दिनेश यादव, भगवान महावीर विकलांग सहायता समितीचे श्री. सुबोध भंडारी, यांच्यासह नगरसेवक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
सन्मानाने जगण्यासाठी सर्वतोपरी मदत करू – मुख्यमंत्री फडणवीस
यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले, जयपूर फूट व इतर सहायक साधने दिव्यांगांना मिळाल्यानंतर त्यांच्या जीवनात बराच बदल होत असल्याचे आपण पाहिले आहे. त्यांच्या जीवनात एक प्रकारचे परिवर्तन झाले आहे. दिव्यांगांपर्यंत सर्व योजना पोहोचाव्या या दृष्टीने अशा शिबीराचा मोठा फायदा होत असतो. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी दिव्यांगांसाठी विविध योजना सुरू केल्या आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांच्या माध्यमातून सातत्याने मनपाद्वारे प्रयत्न होत आहे. सर्व लाभार्थ्यांचा मनपाने रेकॉर्ड ठेवावा. दिव्यांगांना आयुष्यात पुन्हा सहाय्यक साधनांची आवश्यकता भासेल तेव्हा हा रेकॉर्ड काम येईल, असेही त्यांनी सांगितले.
दिव्यांगांना सक्षम करण्यासाटी रोजगार, शिक्षण व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, या तिन्ही बाबीतून दिव्यांगांना समाजात सन्मान मिळवून देण्यास मदत होणार आहे. या माध्यमातून दिव्यांगांची दिव्यांगता कशी कमी करता येईल, यादृष्टीने सुद्धा विचार होण्याची गरज आहे. ऐकू येत नसल्याने अनेक मुले बोलू शकत नाही. कर्णबधिर असलेल्यांना कॉक्लियर इन्प्लांट शस्त्रक्रिया मोफत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर कर्णबधीर असलेले दिव्यांग सुद्धा बोलू शकतात. दिव्यांगांना सुद्धा सन्मानाने जगण्यासाठी गृहनिर्माण योजनांचा लाभ दिला जाईल. दिव्यांगांसाठी 365 दिवस काम करावे लागेल. यासाठी यूडीआयडी कार्ड काढून एकही दिव्यांग योजनांपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. यासाठी मनपाने झोननिहाय शिबीरे घ्यावे. दिव्यांगांच्या पाठीशी राज्य सरकार व मनपा कायम उभी राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली.
दिव्यांगांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न – महापौर
जयपूर फूट साहित्य व सहायक साधने, मोजमाप व वाटप शिबीराच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यातील जवळपास 4 हजारावर लाभार्थींना मदत देऊन दिव्यांगांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करण्याचा हा एक प्रयत्न असल्याचे महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सांगितले. दिव्यांगांना सुद्धा जगण्याची समान संधी याद्वारे देण्याचा प्रयत्न आहे. केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने दिव्यांगांना असलेल्या योजनांचा लाभ देण्यासाठी तसेच मनपातर्फे सुद्धा प्रयत्न करण्यात येत आहे. गेल्या 7 ऑगस्टपासून सुरू असलेले शिबीर योजना समाजाच्या अखेरच्या घटकापर्यंत पोहोचविण्यास मनपा कटिबद्ध राहील. मनपातर्फे दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी 14 योजना राबविण्यात येत असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी दीपप्रज्वलित केल्यानंतर कार्यक्रमाची सुरूवात झाली. महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे मानाचा दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्वागत उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड यांनी केले.
दिव्यांगांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण
यावेळी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी श्रवास पोपटलाल कैकाडे, कुंदन विश्वास शिरसाट, रोहन अमोल देशभ्रतार, भारती मांगलेकर, प्रकाश देवराज चिलविलवार, कु. कृतिका खापेकर, रेहान नितीन दारव्हनकर यांना जयपूर फूट व सहायक साधनांचे वाटप केले. व्यासपीठावर व्हील चेअरने आलेले दिव्यांग जयपूर फूट लावल्यानंतर कुणाचीही मदत न घेता चालत गेले.
पी. आर. मेहता यांचा सत्कार
भगवान महावीर विकलांग सहायता समितीचे प्रमुख श्री. पी. आर. मेहता यांचा मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी मनपाचा मानाचा दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्याचप्रमाणे भोजनाची व्यवस्था करणाऱ्या अन्नामृतचे श्री. श्यामसुंदर शर्मा व श्री. प्रशांत उगेमुगे यांचाही सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.
कर्णबधिरांसाठी विशेष सुविधा
या कार्यक्रमात अनेक कर्णबधिर उपस्थित होते. त्यांना हा सर्व कार्यक्रम समजावा, यासाठी साईन लँग्वेजच्या माध्यमातून कार्यक्रम समजून घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. यावेळी उपस्थित दोन साईन लॅंग्वेज तज्ज्ञांनी संपूर्ण कार्यक्रम सांकेतिक भाषेच्या माध्यमातून कर्णबधिरांना समजून घेण्याची संधी उपलब्ध करून दिली. कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी यांनी केले आभार सत्ता पक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी मानले.