मनपाच्या विद्यार्थ्यांकडून उद्या वंदे मातरम् गजर
हर घर तिरंगा अंतर्गत शहरात विविध कार्यक्रम
Date : 12 Aug 2026
या कार्यक्रमांना महापौर श्रीमती निता ठाकरे, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, विरोधी पक्षनेता श्री. संजय महाकाळकर, आयुक्त डॉ. विपीन, शिक्षण विशेष समितीच्या सभापती श्रीमती संतोषदेवी लढ्ढा उपस्थित राहणार आहेत.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र शासनाच्या 'हर घर तिरंगा' या अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून माननीय महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या मार्गदर्शनात देशभक्तीपर आधारित विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे, लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे तसेच भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता वाढवणे, ही सदर उपक्रम राबविण्यामागील मूळ कल्पना आहे.
याच मालिकेत पुढील तीन दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. गुरूवार दिनांक १३ ऑगस्टला सकाळी ८ वाजता चिटणवीस पार्क, महाल येथे महानगर पालिकेच्या सर्व विद्यालयातील विद्यार्थ्यांचे वंदे मातरम् गायनाचे आयोजन करण्यात आले आहे. भारताचे राष्ट्रीयगीत वंदे मातरम् ला १५० वर्ष पूर्ण झाले असून, स्वातंत्र्यपूर्व काळात स्वदेशी चळवळीत 'वंदे मातरम' च्या माध्यमातून राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यात आला होता, याच अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकतेची भावना निर्माण करण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता दयानंद पार्क समोर, जरीपटका येथे फाळणी भयावहता स्मृतीदिनाच्या अनुषंगाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, १९४७ ला झालेल्या देशाच्या फाळणीमुळे अनेक भारतीयांसोबत झालेल्या अमानवीय यातना, हिंसा आजही प्रत्येक भारतीय नागरिकांमध्ये भय आणि दुःखद भावना निर्माण करते, नागरिकांमध्ये फाळणी समयी झालेल्या संघर्षांची जागरूकता या माध्यमातून निर्माण होईल.
स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.