चिटणीस पार्कमध्ये घुमला ‘वंदे मातरम्’चा जयघोष
सुमारे ५ हजार विद्यार्थ्यांनी एकसुरात केले सामूहिक गायन
Date : 13 Aug 2026
या भव्य कार्यक्रमाला नागपूर महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती नीता ठाकरे तसेच महानगरपालिका आयुक्त श्री विपिन हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महापौर श्रीमती नीता ठाकरे आणि आयुक्त डॉ. विपिन यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना वंदेमातरम् च्या ऐतिहासिक महत्त्व, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला.
कार्यक्रमाची संकल्पना, समन्वय आणि पूर्वतयारीमध्ये नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण सभापती श्रीमती संतोष देवी दीपक लढ्ढा यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. कार्यक्रमाच्या एक दिवस आधी त्यांनी संबंधित अधिकारी आणि शिक्षण विभागाच्या टीमसोबत बैठक घेऊन कार्यक्रमाची रूपरेषा, विद्यार्थ्यांचा सहभाग तसेच आवश्यक व्यवस्थांबाबत मार्गदर्शन केले होते.
मार्गदर्शन करताना महापौरांनी विद्यार्थ्यांचा देशाचे भविष्य असा उल्लेख करीत अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या देशभक्तीने देशासाठी भविष्यात उत्तोमोत्तम कार्य करण्याचा संदेश त्यांनी दिला. त्या पुढे म्हणाल्या की, स्वराज्य मिळवणे हे जितके महत्वाचे आहे, तितकेच महत्त्वाचे स्वराज्यातील सुराज्य टिकवणे आणि निरंतर प्रगतिशील ठेवणे आहे, या आयोजनाच्या माध्यमातून हीच भावना प्रत्येक विद्यार्थी आणि नागरिकांच्या मनात निर्माण होईल अशी अपेक्षा आहे. स्वातंत्र्य दिवस हा देशातील कुठल्याही सणांपेक्षा मोठा सण आहे, यात सर्वात चांगले कार्य म्हणजे प्रत्येक देशवासीयांच्या मनात राष्ट्रप्रेमाची-राष्ट्रभक्तीची भावना निर्माण करणे त्याच अनुषंगाने केंद्र व राज्य शासनाच्या अंतर्गत देशाचे प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महानगरपालिकेच्या माध्यमातून असे विविध देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे,. 'वंदे मातरम' या गीताच्या प्रेरणेने भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी झालेल्या चळवळींना क्रांतिकारांना आणि स्वातंत्र्य सैनिकांना प्रवृत्त केले. आज ते केवळ एक गीत नसून देशाच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देणारे गीत आहे. यावेळी महापौरांनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे आणि शिस्तबद्ध व्यव्हाराचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण सभापती श्रीमती संतोष देवी दीपक लढ्ढा यांनी केले. त्या म्हणाल्या “वंदे मातरम् हे आपल्यासाठी केवळ राष्ट्रगीत नाही, तर भारतमातेप्रती असलेली श्रद्धा, स्वाभिमान आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक आहे. आज हजारो विद्यार्थ्यांनी एकसुरात वंदे मातरम् चे गायन करताना पाहणे हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि भावनिक क्षण आहे. महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच संस्कार, देशप्रेम आणि जबाबदार नागरिक होण्याची प्रेरणा मिळावी, हा आमचा प्रयत्न आहे.”
त्या पुढे म्हणाल्या की, ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षपूर्तीचा आणि नागपूर महानगरपालिकेच्या ७५व्या वर्षाचा हा ऐतिहासिक संगम आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा विषय आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना देशाच्या इतिहासाशी जोडण्याबरोबरच राष्ट्राप्रती आदर आणि जबाबदारीची भावना अधिक दृढ होते.
या प्रसंगी नीता ठाकरे, डॉ. विपिन, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्ता पक्ष नेते श्री नरेंद्र बोरकर, बंडू राऊत, संजय बालपांडे, डॉ. मेघना वासनकर, वंदना महाजन , सुभाष उपासे , डॉ. पीयूष अंबुलकर, धनश्री देशपांडे, ए.सी. बावनकर , वैशाली उदापूरकर, विद्या, वर्षा डोंगरे, मानसी , संजय चावरे तसेच अंकित चौधरी यांच्यासह सर्व सन्माननीय मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये शिक्षण विभागातील अधिकारी, शिक्षक-शिक्षिका, महानगरपालिकेचे कर्मचारी तसेच सर्व सहकार्य करणाऱ्या टीमचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. शिक्षण अधिकारी श्रीमती वंदना महाजन जी यांनी आभार प्रदर्शन करून सर्व मान्यवर, अधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमादरम्यान सुमारे ५ हजार विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन केले आणि संपूर्ण चिटणीस पार्क देशभक्तीच्या भावनेने भारावून गेले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह आणि डोळ्यांतील राष्ट्राविषयीचा अभिमान स्पष्टपणे जाणवत होता.
शिक्षण सभापती श्रीमती संतोष देवी दीपक लढ्ढा यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल महापौर श्रीमती निता ठाकरे, आयुक्त डॉ. विपिन जी , सर्व मान्यवर, अधिकारी, शिक्षक, कर्मचारी आणि विशेषतः महानगरपालिकेच्या सर्व लाडक्या विद्यार्थ्यांचे आभार मानले.
त्या म्हणाल्या की, हा कार्यक्रम कोणत्याही एका व्यक्तीचे यश नसून नागपूर महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधी, प्रशासन, शिक्षण विभाग, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे यश आहे.
“एक व्यासपीठ, हजारो कंठ आणि एकच भावना — भारत माता की जय… वंदे मातरम्!”