राज्य व केंद्र सरकारच्या सहकार्याने शहराचा विकास
महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या हस्ते मनपा मुख्यालयात ध्वजारोहण
Date : 15 Aug 2026
देशाचा 80 स्वातंत्र्य दिन समारंभ शनिवारी मनपा मुख्यालयाच्या हिरवळीवर पार पडला. महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी ध्वजारोहण केले. यानंतर अग्निशमन दलाच्या परेडचे निरीक्षण केले तसेच जवानांच्या प्लाटून कडून मानवंदना स्वीकारली. प्लाटूनचे नेतृत्व श्री. भगवान वाघ, श्री. डी.पी चौहान व श्री. पी.एन कावडकर यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, आयुक्त डॉ. विपीन, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, अतिरिक्त आयुक्त श्री. मरुगानंथम एम., अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम, धरमपेठ झोन सभापती श्री. धनश्री देशपांडे, मंगळवारी झोनच्या सभापती श्रीमती सीमा डवरे, नगरसेविका श्रीमती सुषमा चौधरी, श्रीमती योगिता तेलंग, श्रीमती माधुरी टेकाम, नगरसेविका श्रीमती. अभीरुची राजगिरे, श्रीमती पूजा पाठक, नगरसेवक श्री. अभिजीत झा, नगरसेवक श्री. अतुल कोटेचा, मुख्य वित्त व लेखा अधिकारी श्री. सदाशिव शेळके उपस्थित होते.
विकासाच्या दिशेने मार्गक्रमण : महापौर
यावेळी बोलताना महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी अत्यंत हालअपेष्टा सहन केल्या आहेत. तेव्हा कोणतेही अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य नव्हते. जय हिंद व भारत माता की जय म्हणणे सुद्धा गुन्हा ठरत होता. या स्थितीत हे मोलाने मिळालेले स्वातंत्र्य टिकविण्याची जबाबदारी मोठी आहे. यासाठी आपल्या प्रत्येकाला चोखपणे काम करण्याची आवश्यकता आहे. स्वातंत्र्यानंतर आपण लोकशाही स्वीकारली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात विकासाला गती मिळाली आहे. राज्यात मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी व पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात राज्याचा विकास होत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने शहराचा विकास होत आहे. काही वर्षांपर्यंत विकासाचा अनुशेष शिल्लक राहत होता. ही स्थिती आता बदलली आहे. सफाई कामगारांपासून तर गोरगरीबांच्या विकासाची गरज लक्षात घेऊन योजना आखल्या जात आहे. त्यामुळे आपल्या मनात देशभक्तीची ज्योत टिकवून ठेवल्यास विकासाच्या मार्गावर आपण अधिक ताकदीने मार्गक्रमण करू, असेही श्रीमती निता ठाकरे यांनी सांगितले.
प्रारंभी आयुक्त डॉ. विपीन यांनी महापौर श्रीमती निता ठाकरे यांचे मानाचा दुपट्टा, तुळशीचे रोपटे, बाबूंपासून तयार केलेल्या तिरंग्याची प्रतिकृतीने स्वागत केले. अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित यांनी उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड यांनी स्वागत केले. यावेळी स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे यांचे स्वागत अतिरिक्त आयुक्त श्री. मुरुगानंथम यांनी केले. सत्ता पक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांचे स्वागत अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम यांनी केले. आयुक्त डॉ. विपीन यांचे स्वागत श्री. मुरुगानंथम यांनी केले. सहायक आयुक्त डॉ. सौरभ कावळे यांनी इतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
कर वसुलीसाठी पॉस मशीनचे वितरण
मालमत्ता कर वसुलीमध्ये सुगमत आणण्यासाठी तसेच करदात्यांना त्वरित कर भरता यावा, यासाठी विभागातील कर संग्राहकांना पॉस (पॉईंट ऑफ सेल) मशीनचे वितरण महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्याहस्ते झाले. स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे यांनी कर संग्राहकांना पॉस मशीन देण्याची संकल्पना मांडली होती. या संकल्पनेतून मालमत्ता कर विभागाने 100 पॉस मशीनची खरेदी केली आहे. या पॉस मशीन बद्दलची माहिती अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम यांनी दिली.
अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम यांनी पुढे सांगितले की, पीओएस मशीन वितरणामागील प्रमुख उद्दिष्ट म्हणजे मालमत्ता कराची मागणी देयके वितरित करताना ज्या मालमत्ताधारकांना त्यांचा मालमत्ता कर तत्काळ जमा करावयाचा आहे, त्यांना त्याच ठिकाणी डिजिटल पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. या सुविधेमुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच इतर नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी कार्यालयात वारंवार येण्याची आवश्यकता भासणार नाही, कर भरण्याच प्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक होण्यास मदत होईल.
संपूर्ण वंदे मातरम् चे गायन
वंदे मातरम् गीताच्या रचनेला 150 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केंद्र सरकारने शासकीय कार्यक्रमात वंदे मातरम् चे सर्व कडवे गाण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशांचे पालन करीत स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात संपूर्ण वंदे मातरम् चे गायन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी व श्रीमती शुभांगी पोहरे यांनी केले. आभार श्री. मनीष सोनी यांनी मानले.