मारबत महोत्सवात उत्तम सोयीसुविधा पुरविण्यासाठी मनपा कटिबद्ध : महापौर निता ठाकरे
महापौरांनी घेतला मनपाच्या मारबत महोत्सवाच्या तयारीचा आढावा आयोजन, लोकप्रतिनिधींशी केली चर्चा
Date : 17 Aug 2026
नागपूर महानगरपालिकाद्वारे आयोजित नागपूरच्या पारंपारिक व ऐतिहासिक ओळख असणाऱ्या 'मारबत महोत्सवाच्या अनुषंगाने आवश्यक नियोजन व उपाययोजना करण्यासाठी महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या अध्यक्षतेत सोमवारी (ता.१७) डॉ. पंजाबराब देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात विशेष बैठक पार पडली. बैठकीला आमदार श्री. प्रवीण दटके, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र(बाल्या) बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन, नगरसेविका श्रीमती आभा पांडे, क्रीडा विशेष समिती सभापती श्रीमती दर्शनी धवड, स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती श्रीमती अश्विनी जिचकार, जलप्रदाय विशेष समिती सभापती श्रीमती दिव्या धुरडे, महिला व बालकल्याण विशेष समिती सभापती श्रीमती सारिका नांदुरकर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, श्री. मुरुगानंथम एम., नगरसेवक श्री. सुधीर राऊत, नगरसेवक श्री. संजय बालपांडे, नगरसेविका श्रीमती रामा उईके, श्रीमती अभिरुची राजगिरे, नगरसेवक श्री. संजय चावरे, नगरसेविका श्रीमती सय्यद मुस्कान सय्यद इरफान, नगरसेविका श्रीमती सय्यदा बेगम मोहम्मद निझामुद्दीन, नगरसेवक श्री वासिम खान, नगरसेवक श्री. तुषार लारोकर, नगरसेविका श्रीमती स्वीटी भिसीकर, श्रीमती रेखा निमजे, नगरसेवक श्री. हेमंत बरडे, नगरसेविका श्रीमती चेतना निमजे, श्री. रामभाऊ आंबुलकर, श्री. संजय अवचट, प्रभाग २२ चे नगरसेविका श्री कल्पक भानारकर, श्रीमती उमा देशमुख, श्रीमती कल्पना शर्मा, श्री. श्रीकांत आगलावे, पोलीस उपायुक्त (वाहतूक) श्री. आदित्य मिरखेलकर, मनपाचे उपायुक्त श्री. राजेश भगत, उपायुक्त श्री. मंगेश खवले, काळी व पिवळी मारबत उत्सव समितीचे श्री. विजय खोपडे, श्री. गौरव हरडे, श्री. बुरडे व बडग्या उत्सव समितीचे सदस्य, श्री. विवेक रानडे, व्हीआयडीचे श्री. कपिल चांद्रायन उपस्थित होते.
नागपूर शहरात पर्यटकांचा ओघ वाढविण्यासह शहराचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्यासाठी तसेच नागपूरचा सांस्कृतिक वारसा समृद्धकरण्यासाठी मनपाद्वारे मारबत महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून, यासाठी स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे यांनी मनपाच्या अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. यासंदर्भात झालेल्या बैठकीत मारबत व बडग्या महोत्सवाच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी आयोजन समिती, पोलीस विभाग व इतर सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, तसेच महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासह मारबत महोत्सवाच्या तयारीतील विविध कामांचे नियोजन व अंमलबजावणी सुरळीत पार पाडण्यासाठी एका विशेष 'समन्वय समिती'ची तातडीने स्थापना करण्याचे निर्देश दिले. याशिवाय मारबत व बडग्या यांच्या मिरवणूक मार्गावरील सुसज्ज ठेवावा, मारबती व बडग्या यांच्या स्वागतासाठी प्रमुख ठिकाणी स्टेजची व्यवस्था करावी, विद्युत व्यवस्था करावी, स्वागत गेट उभारावेत आदी सूचना दिल्या.
आमदार श्री. प्रवीण दटके यांनी मारबत-बडग्या हा नागपूरच्या सर्व सामान्य नागरिकांचा उत्सव असल्याचे सांगत समाजातील घातक विषयांना समजा पुढे आणण्यासाठीचे माध्यम आहे. सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या या महोत्सवाची ख्याती जागतिक पातळीवर नेण्यासाठी सर्वांनी मिळून कार्य करायला हवे असे सांगिलते. तसेच मिरवणूक बघण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पाण्यासह इतर सोयी सुविधा उत्तमरित्या पुरविण्यात याव्या, बडग्या तयार करताना काही नवीन संकल्पना सुचवाव्यात अशा सूचना दिल्या.
बैठकीत सर्वप्रथम स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे यांनी संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून मारबत महोत्सवाची संपूर्ण माहिती दिली. त्यांनी सांगितले की, १४५ वर्षांचे ऐतिहासिक महत्त्व असणाऱ्या मारबत उत्सवाला प्राप्त आहे. नागपूरची ऐतिहासिक संस्कृती जपणाऱ्या या महोत्सवात नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग राहावा आणि शहराचे वैभव जगासमोर यावे, यासाठी मनपाद्वारे मारबत महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त व्यक्तींना निमंत्रित केले जाणार आहे. तसेच नागरिकांच्या मनात महोत्सवाचे उत्साह निर्माण व्हावा याकरिता “ईडा पिडा घेऊन जा गे मारबत” असे बोधचिन्ह, मोमेंटो, भेट वस्तू महोत्सवात येणाऱ्या नागरिकांना देण्याचा मानस आहे. याशिवाय संकल्पना निश्चित करून त्यानुसार मारबत व बडग्याचे घोष तयार केले जाणार असल्याचेही शिवानी दाणी यांनी सांगितले. तर मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी संपूर्ण नियोजनासाठी समन्वय समितीमार्फत कार्य केले जाणार असल्याचे सांगितले. तसेच मिरवणूकीच्या मार्गावरील खड्डे, विजेत्या तार व इतर अडथळे दूर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.