अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल साई अकॅडमीची इमारत सील
मनपाद्वारे झोन निहाय नोटीस कारवाईला सुरुवात
Date : 18 Aug 2026
नागपूर महानगरपालिकेने शहरातील अग्निसुरक्षा उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कठोर पावले उचलली असून, महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या निर्देशानुसार अग्निशमन व आणीबाणी विभागामार्फत मंगळवार (ता. १८) रोजी कारवाई करण्यात आली. यात अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल मे. साई अकॅडमीची इमारत सीलबंद करण्यात आली आहे. तसेच मनपाच्या दहाही झोन निहाय नोटीस कारवाई करण्यात येत आहे.
मनपा आयुक्त डॉ. विपीन यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. राजेंद्र उचके यांच्या नेतृत्वात पथकाने अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर तपासणी व कारवाईची मोहीम राबविली. या कारवाईदरम्यान सुगत नगर अग्निशमन केंद्राच्या पथकाने आदर्श कॉलनी, जरीपटका पोलीस स्टेशनजवळील मे. साई अकॅडमी ट्युशन क्लासेसची पाहणी केली. पाहणीमध्ये इमारतीत आवश्यक अग्निसुरक्षा उपाययोजनांचे पालन करत नसल्याचे तसेच जागेचा अनधिकृत वापर होत असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम, २००६ मधील कलम ८(३) अन्वये मनपाच्या अग्निशमन व आणीबाणी विभागाने कायदेशीर कारवाई करत सदर इमारत सीलबंद केली.
या इमारतीत भूतळापासून तिसऱ्या मजल्यापर्यंत वर्गखोल्यांसाठी वापर करण्यात येत होता. तसेच टेरेसवर टिनशेड उभारून त्याचाही वापर ट्युशन क्लासेससाठी केला जात असल्याचे आढळले. आवश्यक अग्निसुरक्षा उपाययोजनांशिवाय वापर होत असल्याने आपत्कालीन परिस्थितीत जीवितास गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता होती. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आणीबाणी विभागाकडून शहरातील शैक्षणिक संस्था, व्यावसायिक आस्थापना व इतर सार्वजनिक वापराच्या इमारतींमध्ये अग्निसुरक्षा नियमांचे पालन होत आहे किंवा नाही, याची तपासणी करून नियमांचे उल्लंघन आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे. अग्निसुरक्षा नियमांचे पालन करून नागरिक व विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.
नरेंद्र नगर अग्निशमन केंद्र तर्फे मानेवाडा - बेसा रोड येथील विठ्ठल कृपा रेडीमेड शॉप, महाराष्ट्र एम्पोरियम, महालक्ष्मी सेलिब्रेशन हॉल ला नोटीस देण्यात आली. आशीनगर झोनमधील वैशालीनगर बिनाकी येथील सुपर केम केमिकल, शुभम केमिकल्स, मे. गणेश स्वीट, मौजा नारी येथील मे. जगत सेलिब्रेशन हॉल, कमाल चौकातील मे. के. जी. एन बिग बाजारक व सुगतनगरातील मे. राज ट्रेडर्स, गुरुनानकपुरा भागातील मे. रजा बिग बाजार, कमाल चौकातील मे. हिरा स्वीट, इंदोरा भागातील मे. हॉटेल अरेबियन ताजला ना हरकत प्रमाणपत्र न घेतल्याबद्दल नोटीस बजावण्यात आली आहे.
धरमपेठ झोन अंतर्गत अनधिकृत बांधकामा विरुद्ध नोटीस प्रक्रीया सुरू
नागपूर महानगरपालिकेच्या धरमपेठ झोन अंतर्गत विविध प्रभागांमध्ये तपासणी आज दिनांक 18 ऑगस्ट 2026 रोजी नोटीसीद्वारे संबंधित संस्थांकडून बांधकामाची मंजूर परवानगी, नकाशे, बांधकामासंबंधीची आवश्यक अभिलेख सादर करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या त्या अधिकृत आहे किंवा अनधिकृत आहे, याबाबत नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
सदर कारवाईमध्ये अग्निशमन विभाग, NDS व अतिक्रमण विभाग तसेच धरमपेठ झोनचे उपअभियंता व सहाय्यक आयुक्त यांचा समवेत ही कारवाई मा. महापौर व मा. आयुक्त, नागपूर महानगरपालिका यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेली असून, संबंधित संस्थांनी नोटीसीमध्ये नमूद केलेल्या कालावधीत आवश्यक कागदपत्रे सादर करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
तपासणीदरम्यान बांधकाम अनधिकृत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कायदे व नियमांनुसार नोटीस, बांधकाम थांबविणे, अनधिकृत बांधकाम हटविणे/पाडणे तसेच आवश्यकतेनुसार इतर वैधानिक कार्यवाही करण्यात येईल.
नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच शहरातील बांधकामांमध्ये कायद्याचे पालन सुनिश्चित करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेची ही कारवाई पुढेही सातत्याने सुरू राहणार आहे. कार्यवाही करण्यात नोटीस बजावण्यात आलेल्या संस्थांची नावे खालील प्रमाणे आहे.
१. श्री. प्रमोद खापरीकर, माहेश्वरी, पंचायत भवन
२. श्री. विनोद जशनानी, इलेक्ट्रॉनीक व्यवसाय,
३. श्री. अनिल बेलिया, राजस्थानी महिला मंडळ,
--
नागपूर : मा. महापौर, नागपूर महानगरपालिका यांच्या दिनांक ०६/०८/२०२६ रोजीच्या सभेत दिलेल्या निर्देशानुसार,नागपूर शहरात अनधिकृत बांधकामांवर आळा घालण्या करीता शहरातील विविध इमारती व बांधकाम येथील अनधिकृत बांधकाम करण्याऱ्या मालमत्ताधारकांना त्यांचे हक्क व मालकी हक्क स्पष्ट करणारे कागदपत्र सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
संदर्भानुसार खालील नमूद ठिकाणी असलेल्या मालमत्ताधारकांनी आपले मालकी हक्काबाबतचे अधिकृत कागदपत्र संबंधित विभागाकडे त्वरित सादर करावेतः
कागदपत्रे सादर.करावयाच्या इमारती व ठिकाणे:
१. सैफी प्रोप्रायटर, के.डी.के. कॉलेज रोड, नागपूर.
२. मे. एज्युकेअर कोचिंग क्लासेस, युक्ती अपार्टमेंट व माऊली कृपा इमारत,
स्वामी गजानन हायस्कूल समोर, खरबी रोड, नागपूर.
३. मे. हॅपीनेस सेलिब्रेशन हॉल व लॉन, श्री हरिश्चंद्र तुळशीराम रागंगधारे, सूरज
टाऊनशिप, वाठोडा चौक ते पारडी रोड, वाठोडा, नागपूर.
मनपा प्रशासनाकडून संबंधित सर्व संबंधितांना सूचित करण्यात येते की, त्यांनी उपरोक्त निर्देशानुसार विहित वेळेत आवश्यक ती कागदपत्रे सादर करून सहकार्य करावे.