अवैध बांधकाम व अतिक्रमणाविरोधात मनपाच्या नोटीस कार्यवाहीला वेग
महापौरांच्या निर्देशानंतर शहरातील सर्व झोनमध्ये कारवाई
Date : 19 Aug 2026
महापौरांच्या निर्देशानुसार मनपाच्या संबंधित विभाग व झोन कार्यालयांमार्फत शहरातील विविध भागांमध्ये अनधिकृत बांधकामांची पाहणी करण्यात येत असून, नियमांचे उल्लंघन आढळलेल्या संबंधितांना नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यामध्ये दुकाने, कारखाने, व्यावसायिक आस्थापना तसेच इतर स्वरूपाच्या अनधिकृत बांधकामांचा समावेश आहे.
लकडगंज झोन : लकडगंज झोन अंतर्गत प्रभाग क्रमांक २३ मध्ये मे. दुल्हेराजा एन. एक्स. प्रो. पोपटलाल नथ्थुलाल पटेल, सुफी होम हार्डवेअर मे. सुभाष हेमानी तसेच मे. रोशन दिलीप मुनियार (रॉयल एनफिल्ड) यांच्याविरोधात विनापरवाना शॉपिंग मॉल/व्यावसायिक आस्थापना चालविल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे.
हनुमान नगर झोन : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (हनुमान नगर) झोन अंतर्गत कॉटन मार्केट अग्निशमन केंद्राच्या कार्यक्षेत्रातील एका इमारतीवर महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना अधिनियम, २००६ (२००७ चा महा. ३) व सुधारित कायदा, २०२३ अन्वये कार्यवाही करण्यात आली. इमारतीच्या निरीक्षणादरम्यान तात्पुरते तसेच अंतिम अग्निसुरक्षा मान्यता प्रमाणपत्र न घेता बांधकामाची परवानगी/मंजुरी, वापरात बदल तसेच अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी हनुमान नगर झोन तर्फे संबंधितांना नोटीस बजावण्यात आली आहे. यात श्री दर्शन राऊत, श्री सतिश कुंडनवार, मे. फस्ट क्राय, श्री विनोद टिकले, श्री इक्बाल अहमद कुरेशी, श्री संजय ढाले, श्री शाम भोयर, श्री गणेश जसवाणी यांचा समावेश आहे.
धंतोली झोन: धंतोली झोन अंतर्गत विविध ऑटोमोबाईल दुकाने, हॉटेल्स तसेच कपड्यांच्या दुकानांची पाहणी करून अनियमितता आढळलेल्या संबंधित आस्थापनांना नोटीस बजावण्यात आली आहे. यात मे. इंद्रायणी टी. व्ही. एस, मे. हॉटेल ओरम लीफ, मे. शिवा फॅशन यांचा समावेश आहे.
धरमपेठ झोन : धरमपेठ झोन अंतर्गत श्री. संत गजानन सेलेब्रेशन या आस्थापनेत करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामाविरोधात मनपाच्या वतीने नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीसीद्वारे संबंधित संस्थांकडून बांधकामाची मंजूर परवानगी, नकाशे, बांधकामासंबंधीची आवश्यक अभिलेख सादर करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या त्या अधिकृत आहे किंवा अनधिकृत आहे, याबाबत नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. यात श्री. पंकज तोतलवार, तमतारा रेस्टॉरेंट, श्री. रोहीत गजभिये, संत श्री गजानन सेलिब्रेशन, सेंटर पॉइंट शाळा, अमरावती बायपास,दाभा, नागपूर यांचा समावेश आहे.
सतरंजीपुरा झोन: सतरंजीपुरा झोन अंतर्गत परिसरातील अनधिकृत बांधकामांविरोधात धडक कार्यवाही करण्यात आली. संबंधित बांधकामांची पाहणी करून संबंधितांना यापूर्वी नोटीस बजावण्यात आली होती. मुदत देऊनही नियमांचे पालन न झाल्याने नियमानुसार अनधिकृत बांधकाम हटविण्याची कार्यवाही करण्यात आली.
शहरातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे तसेच नियमबाह्य वापराविरोधात मनपाच्या सर्व संबंधित विभाग व झोन कार्यालयांमार्फत पुढील काळातही सातत्याने कार्यवाही करण्यात येणार आहे. नागरिकांनी व व्यावसायिक आस्थापनांनी बांधकाम व वापरासंदर्भात मनपाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.