अर्धवट वंदे मातरम् गीता वरून महापौरांचे आयुक्तांना चौकशीचे आदेश
वंदे मातरम् च्या गायनाची कार्यपद्धती निश्चित करावी
Date : 21 Aug 2026
मनपाच्या सर्वसाधारण किंवा विशेष बैठकीची सुरूवात राष्ट्रीयगीत वंदे मातरम् ने करण्याची परंपरा प्रचलित आहे. केंद्र सरकारने वंदे मातरमच्या रचनेला 150 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून सर्व शासकीय कार्यक्रमांमध्ये वंदे मातरमचे सर्व सहा कडवे गायनाच्या संदर्भात घटनादुरुस्ती केली आहे. यामुळे सर्व शासकीय कार्यक्रमामध्ये आता वंदे मातरमची सहा कडवे गायन आवश्यक झाले आहे.
मात्र गेल्या 20 ऑगस्टला झालेल्या मनपाच्या सर्वसाधारण सभेच्या सुरूवातीला वंदे मातरम् ची पहिली दोन कडव्यांचीच ध्वनीफित वाजविण्यात आली आहे, याकडे महापौरांनी आयुक्तांचे लक्ष वेधले आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वपूर्ण प्रेरणास्थान राहिलेल्या या राष्ट्रीयगीताचा उचित सन्मान व आदर राखणे अपेक्षित आहे. मनपाच्या सर्वसाधारण बैठकीत अर्धवट वंदे मातरम् ची ध्वनीफित वाजणे ही बाब उचित नसून, यासंदर्भात या हलगर्जीपणासाठी जबाबदार व्यक्तींवर कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्यावर कारवाई कां करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावावी. यापुढे असा प्रकार घडणार नाही. यासाठी वंदे मातरम् गायनाची कार्यपद्धतीन निश्चित करावी, असेही निर्देश महापौर श्रीमती ठाकरे यांनी आयुक्तांना दिले आहेत.