नागपूरचा ऐतिहासिक मारबत महोत्सव आता जागतिक स्तरावर
स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे यांनी दिल्लीत जाऊन दिले निमंत्रण
Date : 24 Aug 2026
स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे यांनी दिल्लीत मध्ये नागपूरच्या या ऐतिहासिक आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरेला नव्या उंचीवर नेण्याच्या उद्देशाने महोत्सवाचे अधिकृत निमंत्रण दिले. यात गुजरातचे उपमुख्यमंत्री श्री. हर्ष संघवी, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. आशिष शेलार, माजी केंद्रीय मंत्री श्रीमती स्मृती इराणी, खासदार श्री. विनोद तावडे यांना श्रीमती शिवानी दाणी वखरे यांनी स्वतः महोत्सवासाठी निमंत्रित केले.
महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या मार्गदर्शनात व उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र(बाल्या) बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन यांच्यासह क्रीडा विशेष समिती सभापती श्रीमती दर्शनी धवड यांच्या देखरेखीत मारबत व बडग्या महोत्सवाची तयारी केल्या जात आहे. त्यातच एक भाग म्हणून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवरांना महोत्सवासाठी निमंत्रित केले जात आहे.
विशेष निमंत्रण बॉक्स
मान्यवरांच्या मनात महोत्सवाचा उत्साह निर्माण व्हावा यासाठी “इडा पिडा घेऊन जा गे मारबत” असे बोधचिन्ह, मोमेंटो आणि भेटवस्तू असणारा विशेष निमंत्रण बॉक्स श्रीमती शिवानी दाणी यांनी मान्यवरांना दिला. यावेळी श्रीमती शिवानी दाणी वखरे यांनी मारबत महोत्सवाला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासह मनपाच्या विविध नियोजनांची माहिती दिली. यात नागरिकांच्या आकर्षणासाठी ७ दिवसीय विशेष 'सावजी आणि बुनकर महोत्सवाचे' आयोजन, शहरातील १०० चौकांमध्ये QR कोडच्या माध्यमातून ऑडिओ-व्हिज्युअल फिल्मची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सांगत त्यांनी शहरात एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून देशभक्तीपर गीतांचे प्रसारण करणे, महोत्सवासाठी बाहेरून येणाऱ्या पर्यटकांसाठी शहरातील हॉटेल व निवासी व्यवस्थेचा दर्जा उंचावण्यासाठी विशेष ग्रेडिंग व प्रमाणपत्र प्रणाली राबवली जाणार असल्याचे त्यांनी मान्यवरांना सांगितले.
नागपूरची ऐतिहासिक संस्कृती जपणाऱ्या आणि १४५ वर्षांचे ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या या मारबत महोत्सवासाठी मनपाच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली आहे. नागपूरच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन, संवर्धन आणि जागतिक स्तरावर प्रसार करण्याच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. महोत्सवात नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग राहावा आणि शहराचे वैभव जगासमोर यावे, यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त व्यक्तींना निमंत्रित केले जाणार आहे.