थकीत मालमत्ता कर वसुलीच्या मोहिमेला उत्तम प्रतिसाद
मिहान इंडिया लिमिटेडकडून रू. ५ कोटीचा धनादेश सुपूर्द
Date : 24 Aug 2026
महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या निर्देशानुसार व आयुक्त डॉ. विपीन यांच्या मार्गदर्शनात व मोहिमेला सुरूवात झाली आहे. या मोहिमेचे नेतृत्व मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. मुरुगानंथम एम., आणि श्री. मिलिंद मेश्राम करीत असून, मोहिमेअंतर्गत 1 हजार कोटी रुपये थकीत मालमत्ता कर वसूल करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी सोमवारी(ता.२४) थकीत मालमत्ता कर वसुलीचा आढावा घेतला.
मनपाच्या स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे व सत्ता पक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर तथा कर संकलन समिती सभापती श्रीमती सरिता कावरे यांनीही नागरिकांना थकीत मालमत्ता कर भरण्याचे आवाहन केले आहे.
मालमत्ता कर वसूली अभियानांतर्गत Mihan India Limited / Maharashtra Airport Development Co Ltd कडून रु. ५ कोटी, म्युरे मेमोरियल हॉस्पिटल कडून रु. ७४ लाख ८८ हजार ४२४ तसेच हॉटेल सेव्हन कडून रु. १० लाख इतका मालमत्ता कर वसूल करण्यात आला आहे. संबंधित थकीत मालमत्तांवर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईनंतर ही रक्कम वसूल झाली आहे. सर्व झोनमध्ये वसुलीची कार्यवाही अधिक गतिमान करण्यात आली आहे. तसेच महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन यांनी मालमत्ता कर वसूली अभियानाचा आढावा घेताना थकीत कराची प्रभावी व तातडीने वसुली करण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. शहरातील मोठ्या थकबाकीदारांकडून प्राधान्याने कर वसूल करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
व्यावसायिक मालमत्तांना प्राधान्य :
मालमत्ता कर वसूलीमध्ये व्यावसायिक (Commercial) मालमत्तांना व मोठ्या थकबाकी दारकांना प्राधान्य देऊन मोठ्या थकबाकीदारांकडून कर वसुली करण्याच्या सूचना मा. महापौर यांनी दिल्या आहेत. त्यानुसार संबंधित झोनमधील अधिकारी व कर वसुली पथकांकडून मोठ्या थकबाकी असलेल्या मालमत्तांची तपासणी करून नियमानुसार नोटीस, जप्ती व इतर आवश्यक कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.
नागपूर महानगरपालिकेने सर्व मालमत्ताधारकांना आपला थकीत मालमत्ता कर त्वरित भरून महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. कर थकीत ठेवणाऱ्या मालमत्तांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असून, मालमत्ता कर वसूली अभियान यापुढेही अधिक तीव्रतेने राबविण्यात येणार आहे. प्रलंबित कराचा भरणा न करणाऱ्या संबंधित थकबाकीदारांबाबत महानगरपालिकेच्या नियमानुसार उपलब्ध असलेल्या सेवांवर आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबतही सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही कारवाई होण्यापूर्वी आपला प्रलंबित कर तातडीने भरून महानगरपालिकेच्या कर वसुली मोहिमेस सहकार्य करावे. असे आवाहन महापौर यांनी केले आहे.