गणेशोत्सव मंडळांना एकाच ठिकाणी मिळणार सर्व परवानगी महापौर निता ठाकरे यांच्या हस्ते 'एक खिडकी योजनेचे' लोकार्पण
मनपाचे 'एक खिडकी, ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित
Date : 27 Aug 2026
गणेशोत्सवाच्या काळात मंडळांना मंडप उभारणी, अग्निशमन सुरक्षा, वीज व्यवस्था तसेच इतर संबंधित बाबींसाठी विविध विभागांकडून आवश्यक परवानगी आणि ना हरकत प्रमाणपत्र घ्यावी लागतात. या प्रक्रियेसाठी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना विविध कार्यालयांमध्ये जावे लागू नये आणि एकाच ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता यावा, या उद्देशाने ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे गणेशोत्सव मंडळांसाठी परवानगी मिळविण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि नागरिकाभिमुख होणार असून, वेळ व श्रमाची बचत होण्यास मदत होणार आहे.
विविध विभागांच्या परवानग्यांसाठी एकाच ठिकाणी सुविधा ‘एक खिडकी योजना’ ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून गणेशोत्सव मंडळांना आवश्यक परवानगी व ना हरकत प्रमाणपत्रांसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन सादर करता येणार असल्याने संबंधित मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष कार्यालयात वारंवार जाण्याची आवश्यकता कमी होणार आहे. ऑनलाइन प्रक्रियेमुळे अर्ज सादर करण्यापासून परवानगी प्रक्रियेपर्यंतची कार्यवाही अधिक सुलभ व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यास मदत होणार आहे. नागरिकांना आपल्या अर्जाच्या परवानगीची सद्यस्थिती सम्बंधित माहिती बघता येणार आहे. विशेषतः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने येणाऱ्या परवानगी अर्जांचे व्यवस्थापन करण्यासाठीही ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.
झोनमध्ये सुद्धा करता येणार अर्ज भरणा 'एक खिडकी योजना' अंतर्गत पोर्ट्लसह शहरातील दहा झोनमध्ये देखील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी राहणार आहे, ज्यामुळे झोन कार्यालयात एकाच ठिकणी गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांना परवानगी अर्ज भरण्याची सुविधा करण्यात आली आहे. इच्छुक मंडळ झोन कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरणा करू शकतात. यामुळे प्रत्यक्ष अर्ज भरतांना विविध विभागाच्या पर्वांगीकरिता विविध कार्यालयात जाण्याची गरज पडणार नाही आणि कामे सुलभ होईल.
घरबसल्या करता येणार अर्ज या पोर्टलची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांना घरबसल्या ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. आवश्यक कागदपत्रे व संबंधित माहिती ऑनलाइन सादर करून परवानगी प्रक्रियेसाठी अर्ज करता येईल. गणेश मंडळांना नागपूर महानगरपालिकेच्या ऑनलाइन सेवा पोर्टलवर जाऊन आवश्यक माहिती भरून परवानगीसाठी अर्ज करता येणार आहे. https://nmcnagpur.gov.in/RTSservices/ws/user/login.do