महापौरांनी केली मनपा शाळेची आकस्मिक पाहणी
शिक्षण व्यवस्था, मूलभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या स्थितीचा आढावा
Date : 27 Aug 2026
या पाहणीवेळी, शिक्षण विशेष समिती सभापती श्रीमती संतोषदेवी दीपक लढ्ढा, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित, शिक्षण अधिकारी श्री. अमित भदाने तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी शाळेच्या परिसराची पाहणी करण्याबरोबरच शिक्षकांशी संवाद साधला तसेच विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या गरजा आणि अडचणी जाणून घेतल्या. शाळांमधील उपलब्ध सुविधांचा आढावा घेताना ज्या ठिकाणी सुधारणा आवश्यक आहेत, त्या बाबींचीही गांभीर्याने नोंद करण्यात आली.
यावेळी महापौरांनी सांगितले की, महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देणे हे प्राधान्य आहे. अशा आकस्मिक भेटींमुळे शाळांची वास्तविक परिस्थिती समोर येते आणि आवश्यक सुधारणा तातडीने करण्यासाठी प्रभावी पावले उचलता येतात. त्यांनी या शाळेत मुख्याध्यापकांची नियुक्ती तात्काळ करने तसेच शिक्षकांची रिक्त पदे भरण्याचे निर्देश मनपा आयुक्तांना दिले.
शिक्षण सभापती यांनीही शाळांतील व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा घेत विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक सुविधांना प्राधान्य देण्याबाबत महापौर आणि अतिरिक्त आयुक्त यांना सूचना केल्या.
नागपूर महानगरपालिकेचे उद्दिष्ट शहरातील प्रत्येक महानगरपालिका शाळा ही विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षण, उत्तम सुविधा आणि उत्तम संस्काराचे केंद्र बनविणे हे आहे. त्याच दिशेने शाळांची नियमित पाहणी आणि आवश्यक सुधारणा करण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू राहणार आहे, असे श्रीमती लड्ढा यांनी सांगितले.