थकीत मालमत्ता कर धारकांची मालमत्ता जप्त
मनपाची मोठी कारवाई
Date : 27 Aug 2026
महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या निर्देशानुसार व आयुक्त डॉ. विपीन यांच्या मार्गदर्शनात व मोहिमेला सुरूवात झाली आहे. या मोहिमेचे नेतृत्व मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. मुरुगानंथम एम., आणि श्री. मिलिंद मेश्राम करीत असून, मोहिमेअंतर्गत 1 हजार कोटी रुपये थकीत मालमत्ता कर वसूल करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. मनपाच्या स्थायी समितीच्या सभापती श्रीमती शिवानी दाणी-वखरे व सत्ता पक्षनेता श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर तथा कर संकलन समिती सभापती श्रीमती सरिता कावरे यांनीही नागरिकांना थकीत मालमत्ता कर भरण्याचे आवाहन केले आहे.
मालमत्ता कर वसूली अभियानांतर्गत नेहरूनगर झोन अंतर्गत मे. श्री गजानन सेलेब्रेशन लॉनवर जप्तीची कारवाई करण्यात आली असून, सदर मालमत्ताधारक (श्री. दिलीप नामदेवराव ढवळे, श्री. किशोर नामदेवराव ढवळे व श्री. अविनाश नामदेवराव ढवळे) यांच्याकडे मनपाचा एकूण ९०,३६,५८९/- रुपये इतका मालमत्ता कर थकीत आहे. वारंवार नोटीस देऊनही थकीत कराचा भरणा न केल्यामुळे सदर मालमत्ता जप्त करण्यात आली असून प्रवेशद्वारावर जप्ती अधिपत्र (जप्तीचे वॉरंट) चिकटवण्यात आले आहे.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हनुमाननगर झोन अंतर्गत १० मालमत्तांवर कारवाई करण्यात आली. त्यात हॉटेल तायबा यांच्यावर थकीत असलेल्या १४,०२,३५९ रूपांच्या कर रक्कमेची भरणा न केल्यामुळे झॉनद्वारे १७,९४,००० रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. तसेच गुरुवारी १० लक्ष रुपयांचा धनादेश झॉनद्वारे जप्त करण्यात आला आहे.
गांधीबाग झोन अंतर्गत ११ मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात आली, यातील पाच मालमत्ता धारकांनी थकीत मालमत्ता कराची भरणा केली. थकीत मालमत्ता कर वसुली मोहिमेच्या अनुषंगाने गांधीबाग झोनने एका दिवसात ३,२३,००० रु. धनादेशाद्वारे वसुली केली आहे. तसेच उर्वरित ६ मालमत्तांना जप्त करण्यात आले आहे यात श्री. यशवंत पुंडलिक तेली, श्रीमती मसुदा बेगम W/O श्री.असद खान, श्री.अब्बूमिया खान, श्री.जाफरउल्लाखा, श्री.नदीम अहमद खाँ विलायतुल्ला खाँ यांची घर जप्त करण्यात आली असून भीमदल आखाडा विरुद्ध सुद्धा जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
व्यावसायिक मालमत्तांना प्राधान्य : मालमत्ता कर वसूलीमध्ये व्यावसायिक (Commercial) मालमत्तांना व मोठ्या थकबाकी दारकांना प्राधान्य देऊन मोठ्या थकबाकीदारांकडून कर वसुली करण्याच्या सूचना मा. महापौर यांनी दिल्या आहेत. त्यानुसार संबंधित झोनमधील अधिकारी व कर वसुली पथकांकडून मोठ्या थकबाकी असलेल्या मालमत्तांची तपासणी करून नियमानुसार नोटीस, जप्ती व इतर आवश्यक कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.
नागपूर महानगरपालिकेने सर्व मालमत्ताधारकांना आपला थकीत मालमत्ता कर त्वरित भरून महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. कर थकीत ठेवणाऱ्या मालमत्तांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असून, मालमत्ता कर वसूली अभियान यापुढेही अधिक तीव्रतेने राबविण्यात येणार आहे. प्रलंबित कराचा भरणा न करणाऱ्या संबंधित थकबाकीदारांबाबत महानगरपालिकेच्या नियमानुसार उपलब्ध असलेल्या सेवांवर आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबतही सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही कारवाई होण्यापूर्वी आपला प्रलंबित कर तातडीने भरून महानगरपालिकेच्या कर वसुली मोहिमेस सहकार्य करावे. असे आवाहन महापौर यांनी केले आहे.