क्रीडा सभापतींसह अतिरिक्त आयुक्तांनी केली विविध मैदानांची पाहणी
Date : 28 Aug 2026
पाहणीदरम्यान नगरसेवक श्रीमती साधना बरडे, गलिच्छ वस्ती निर्मुलन व घर बांधणी विशेष समिती सभापती श्रीमती रूतिका मसराम, नगरसेवक श्री. विनोद कान्हेरे, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त श्री. राजकुमार मेश्राम, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर यांच्यासह मनपाचे इतर संबंधित अधिकारी व उपद्रव शोध पथकाचे जवान प्रामुख्याने उपस्थित होते.
मनपाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी ७५ मैदाने अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज असे विकसित केली जाणार आहेत. यामुळे शहरातील युवा क्रीडापटूंना व्यावसायिक सरावासाठी दर्जेदार सुविधा मिळणार आहेत. यासंदर्भात मनपाच्या क्रीडा विशेष समिती सभापती श्रीमती दर्शनी धवड आणि अतिरिक्त आयुक्त श्री. अंकित यांनी फ्रेंड्स कॉलनी नीम पार्क, फ्रेंड्स कॉलनी नाला लागत बगीचा, रामनगर मैदान, अंबाझरी हिल रोड, तेलंगखेडी रवीनगर, लेंड्रा उद्यान आदी मैदानांची पाहणी केली.
यावेळी त्यांनी मैदानात राबविण्यात येणाऱ्या विकासात्मक उपक्रमांची माहिती जाणून घेतली. तसेच ज्या मैदानांमध्ये सुरुक्षा भिंतीच्या दुरुस्तीची गरज आहे, अशा ठिकाणी दुरुस्ती करून घ्यावे, नागरिकांना चालण्यासाठी वॉकिंग ट्रक तयार करावा, मैदानांमध्ये स्वच्छता संदर्भात नियोजन करावे, ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक त्या सुविधा कराव्या आदी सूचना दिल्या.