हजारोंच्या संख्येत बहिणींनी घेतला मोफत प्रवासाचा लाभ
‘रक्षाबंधनानिमित्त 'आपली बस'च्या उपक्रमाला उदंड प्रतिसाद महिला आणि 10 वर्षांखालील मुलांनी घेतला मोफत प्रवासाचा आनंद
Date : 28 Aug 2026
तसेच रक्षाबंधनाच्या निमित्ताने मोरभवन बस स्टॉप येथे रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपिन, अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम, नगरसेविका पुजा पाठक, नगरसेवक श्री.विजय होले, परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी श्री. योगेश लुंगे, परिवहन विभाग अधिकारी, बस ऑपरेटर्स व अनेक चालक -वाहक उपस्थित होते. कार्यक्रमात महापौर, स्थायी समिती सभापती आणि परिवहन समिती सभापती यांनी सत्तापक्ष नेते, मनपा आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, अधिकारी, कर्मचारी, बस चालक आणि वाहकांना राखी बांधून, मिष्ठान देऊन शुभेच्छा दिल्या.
रक्षाबंधनाचा सण कुटुंबीयांसोबत साजरा करण्यासाठी नागरिकांना प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुलभ व्हावा, तसेच सणाच्या काळात नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी यावेळी केले. स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे यांनी यावेळी उपस्थितांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली.
परिवहन समिती सभापती श्रीमती मंगला खेकरे यांच्या संकल्पनेनुसार राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे सर्व नागरिक साक्षीदार झाले. आपले वाहक बंधू जे प्रवासात सर्व बहिणीचें संरक्षण करीत असतात ज्यामुळे प्रत्येक महिला सुरक्षितेचा अनुभव करते, आज त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना राखी बांधण्यात आली. हा दिवस फक्त भावांसाठीच नाही तर वाहक बहिणींप्रतीसुद्धा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र बोरकर यांनी उपक्रमाबद्दल बोलताना महापौर श्रीमती निता ठाकरे, परिवहन समिती सभापती श्रीमती मंगला खेकरे, मनपा आयुक्त डॉ. विपीन यांच्या प्रयत्नांतून रक्षाबंधनानिमित्त सर्व महिलांना मोफत प्रवास करता आला असल्याचे मत मांडले. या उपक्रमाला राबविल्याबद्दल अभिनंदन करीत आनंद व्यक्त केला.
नागपूरकरांना सुलभ, विश्वासार्ह आणि प्रवासी-केंद्रित सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्याच्या परिवहन विभागाच्या वचनबद्धतेचा हा उपक्रम असल्याचे परिवहन सभापती श्रीमती मंगला खेकरे यांनी सांगितले आहे.
या विशेष उपक्रमांतर्गत शुक्रवार (ता.२८) रोजी दिवसभर महिला आणि १o वर्षांखालील मुलांनी आपली बसमधून मोफत प्रवास करत उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला. उपक्रमामुळे नागरिकांना शहरातील विविध ठिकाणी आपल्या कुटुंबीय आणि आप्तस्वकीयांना भेटण्यासाठी सोयीस्करपणे प्रवास करता आला आणि रक्षाबंधनाचा सण आनंदाने साजरा करता आला असे मत लाभार्थ्यांनी व्यक्त केले.
शहरातील महिलांसाठी या उपक्रमामाच्या माध्यमातून प्रवास सोयीचा झाल्याने दिवसभर बस सेवेत मोठ्या संख्येने प्रवास झाला. महापौरांच्या सार्वजनिक परिवहनाच्या माध्यमांचा जनतेने विशेषतः महिलांनी लाभ घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. सणाच्या औचित्याने नागरिकाभिमुख होऊन घेण्यात आलेल्या महानगरपालिकेच्या स्तुत्य उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले.