उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
लकडगंज व गांधीबाग झोन पथकाचा संयुक्त छापा टाकत ६२५ किलो प्रतिबंधित प्लॅस्टिक जप्त
Date : 31 Aug 2026
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, लकडगंज झोनचे उपद्रव शोध पथक आणि गांधीबाग झोनच्या पथकाने संयुक्त कारवाई करीत वर्धमान नगर येथील ऑक्ट्रॉय फ्री झोनमधील 'मेसर्स हरिओम ट्रेडर्स' यांच्या आस्थापनेवर छापा टाकला. या कारवाईदरम्यान दुकानात बेकायदेशीरपणे साठवून ठेवलेले ६२५ किलो प्रतिबंधित सिंगल युझ प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. तसेच, एमपीसीबी नियम-२००६ अंतर्गत संबंधितांवर कारवाई करीत ५ हजार रुपयांचा पहिला दंड आकारण्यात आला.
लकडगंज झोन अंतर्गत मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित प्लॅस्टिक साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती उपद्रव शोध पथकाच्या जवानांना मिळाली होती. जवानांनी तात्काळ ही महत्त्वाची माहिती एनडीएस प्रमुख श्री. वीरसेन तांबे यांना दिली. त्यानंतर त्यांनी त्वरीत उपायुक्त श्री. राजेश भगत यांना याची माहिती अवगत केली. उपायुक्त श्री. राजेश भगत यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हा छापा टाकण्यात आला व अवैध प्लॅस्टिक साठा जप्त करण्यात आला. यात लकडगंज झोनचे उपद्रव शोध पथक प्रमुख श्री. सुशील गुप्ते आणि गांधीबाग झोनच्या पथकाने प्रमुख श्री.नथ्थू खांडेकर यांच्या नेतृत्वात जवानांनी कारवाई केली.