परिवहन समितीच्या बैठकीत विविध विषयांना मंजुरी
Date : 01 Sep 2026
बैठकीत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ आणि घरभाडे भत्ता, बस चालक-वाहकांसाठी मोफत स्मार्ट स्वच्छतागृह, 'देवदर्शन यात्रा बस सर्किट'चा शुभारंभ तसेच जुन्या स्क्रॅप बसेसच्या विल्हेवाटीबाबतचे निर्णय घेण्यात आले आहेत.
यात शासन अधिसूचना दिनांक १४/१०/२०२४ नुसार कंत्राटी सहाय्यक, मेंटेनन्स व ऑपरेशन कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ सुचवण्यात आली आहे. तसेच डिझेल बस ऑपरेटरच्या मूळ किलोमीटर दरात रू ४.११ प्रति किमी वाढ आणि पीएमआय कर्मचाऱ्यांकरिता वाढ तसेच घरभाडे भत्ता सुमारे १ हजार ८८० वाहक कर्मचाऱ्यांना 'महाराष्ट्र कामगार किमान घरभाडे भत्ता कायदा, १९८३' नुसार दरमहा सुमारे रू ९५२- इतका एचआरए प्रस्तावित करण्यात आला आहे. हा विषय सूचनेसह मंजूर करण्यात आला.
याशिवाय मोर भवन डेपो-२ येथील स्मार्ट सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर बस चालक, वाहक व कर्मचाऱ्यांसाठी पूर्णपणे विनामूल्य (नि:शुल्क) करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
नागपूर शहर व परिसरातील प्रमुख धार्मिक व सांस्कृतिक स्थळांना जोडण्यासाठी (उदा. टेकडी गणेश, दीक्षाभूमी, मोठा ताजबाग, स्वामिनारायण मंदिर, कोरडी, चिचोली इ.) विशेष बस सेवा सुरू करण्यात येत आहे.
सद्यस्थितीत प्रायोगिक तत्त्वावर दररोज ८ तासांच्या ट्रिपमध्ये 'Chalo Mobility Call Centre' द्वारे ऑन-डिमांड आणि डिजिटल बुकींग करून ही सेवा शनिवार व रविवार (वीकेंडला) देखील उपलब्ध असणार आहे.
प्रस्तावित भाडे (८ तासांसाठी) :
४० आसनी बस: रू.७,०००/-
३० आसनी बस: रू.६,०००/-
२५ आसनी बस: रू.५,०००/-
JnNURM योजनेअंतर्गत आयुर्मान पूर्ण झालेल्या एकूण ११४ स्क्रॅप बसेसपैकी विशेष कामांसाठी काही बसेस राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यातील ०२ बसेस 'स्त्री महाशक्ती प्रकल्पाकरिता' तर ०४ बसेस 'कंटीन व सार्वजनिक हितास्तव' राखीव ठेवण्यात येतील. उर्वरित १०८ स्क्रॅप बसेसची MSTC मार्फत ऑनलाइन ई-लिलाव (Online E-Auction) पद्धतीने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून विल्हेवाट लावली जाईल.